काही दिवासांपूर्वी पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. खेडकर यांचा शेतातील व्हायरल व्हिडिओमध्ये त्या शेतकऱ्यांना धमकावताना दिसत होत्या. आता मनोरमा यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. संबंधित व्हिडिओ हा २०२२ मधील असून महाराष्ट्र पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.
खेडकर कुटुंबाचा पुण्यातील बाणेर रस्त्यावर ओम दीप नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या समोर काही काळापासून मेट्रोचे काम सुरू होते. कर्मचाऱ्यांनी मेट्रोच्या कामासाठीचे साहित्य खेडकर यांच्या बंगल्या समोरच्या फुटपाथवर ठेवले होते. त्यावरून मनोरमा खेडकर यांनी मेट्रोच्या कर्मचाऱ्यांसोबत वादाला सुरुवात केली होती. हा वाद इतका वाढला की मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना दिली. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील कर्मचारी तिथे पोहचले. मात्र मनोरमा यांनी त्यांच्याशी देखील वाद घातला. मनोरमा खेडकर यांनी मेट्रोचे अधिकारी आणि पलिसांशी हुज्जत घालतानाचा हा व्हिडिओ एका कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून रेकॉर्ड केला होता.
शेतात पिस्तूल घेऊन दिली होती धमकी
पुण्यातील मुळशी येथील धडवली गावात मनोरमा यांनी २५ एकर जमीन खरेदी केली होती. या जमीनीच्या बाजूला असलेली जागा देखील त्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या जमिनीच्या मालकाने विरोध केला. यावर मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल घेऊन त्यांना धमकावले होते. जागा ताब्यात घेण्यासाठी त्या बाउन्सर देखील घेऊन गेल्या होत्या.