मराठवाड्यात जरांगे कार्डचा फायदा कुणाला?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाने सर्वांचेच अंदाज चुकवलेच नाही तर चुकते केले असे म्हणावे लागेल. लोकसभेनंतर विधानसभेतील निकाल काय असतील याविषयी संभ्रम होता. यावेळी सहा प्रमुख पक्ष दोन आघाड्यांमध्ये लढत होते. तर तिसरी आघाडी, वंचित, एमआयएम, मनसे, अपक्ष अशी मोठी भाऊगर्दी होती. तरीही जनतेच्या दरबारात एकांगी निकाल लागला. भाजपाला मोठा विजय मिळाला. तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरकसपणे दिसला नसला तरी त्याची धग कायम होती. मराठवाड्यात या निवडणुकीत मराठा कार्ड चालल्याचे दिसून आले. मराठवाड्यात इतके मराठा आमदार निवडून आले.
मराठा आरक्षणाची धग
मराठवाड्यात आजही मराठा आरक्षणाची धग कायम आहे. निवडणूक निकाल काही असले तरी ओबीसी, मराठा, धनगर आरक्षणाचे मुद्दे संपले, इतिहास जमा झाले असे म्हणता येणार नाहीत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाची झळ सत्ताधाऱ्यांना लोकसभेत बसली. त्यानंतर हा मुद्दा निष्प्रभ करण्याचा प्रयत्न इतर माध्यमातून झाला. पण हा मुद्दा लागलीच संपणार नाही हे सत्ताधाऱ्यांनाही माहिती आहे. त्यामुळे उमेदवारी देताना सुद्धा सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाला झुकतं माप दिल्याचे दिसून आले. अनेक पट्ट्यात महायुतीने हा सामाजिक समतोल साधला आहे.
महाविकास आघाडीचा सुपडा साफ
मराठवाड्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. मराठवाड्यातील विधानसभेच्या 46 पैकी केवळ 5 जागा कशाबशा महाविकास आघाडीला राखता आल्या आहेत. तर राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा मिळाली आहे. तर दुसरीकडं महायुतीला मात्र 46 पैकी 40 जागांवर घवघवीत यश मिळालं आहे. अनेक जण महाविकास आघाडीसोबतच जरांगे फॅक्टर संपल्याचा दावा करत आहे. पण मनोज जरांगे यांनी निकालापूर्वीच समाजाला उपोषणाची तयारी ठेवण्याचा सांगावा पाठवला आहे. त्यामुळे हा मुद्दा सहजासहजी निकाली काढता येणार नाही, याचे त्यांनी निकालापूर्वीच संकेत दिले होते. सरकार कोणतेही येऊ संघर्षासाठी त्यांनी मराठा समाजाला तयार राहण्याची सूचना अगोदरच केली होती.
29 जागांवर मराठा आमदार
मराठवाड्यातील विधानसभेच्या एकूण 46 जागांपैकी 29 ठिकाणी मराठा उमेदवार विजयी झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यात महायुतीचे मराठा कार्ड चालल्याचे दिसून येते. महायुतीचे सर्वात जास्त 25 मराठा आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे मराठा फॅक्टरचा सर्वाधिक महायुतीलाच फायदा झाल्याचे दिसून येते. तर महाविकास आघाडीचे फक्त 4 मराठा आमदार विजयी झाल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. ओबीसींचे 8 आमदार विजयी झाले आहेत. 8 पैकी 7 ओबीसी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर राखीव जागांवर 5 दलित उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात 1 आदिवासी, 1 स्वामी, 1 मुस्लिम, 1 जैन समाजाचा आहे.