Pravin Darekar to Manoj Jarange Patil : मला वाटतं की मराठा समाजाला देखील याचा उबग आणि किळस आली आहे की, आंदोलनामागील सत्य आता समोर येत आहे, असेही दरेकर यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. यादरम्यान त्यांनी २० जुलैपासून सुरु केलेले आमरण उपोषण आज सोडले. तसेच जरांगे यांनी सरकारला १३ ऑगस्ट पर्यंतची मुदत देखील यावेळी दिली आहे. इतकेच नाही तर जरांगेंनी आपण विधानसभेची तयारी करणार असल्याचे संकेत देखील यावेळी दिले. विधानसभेत आपले ४० ते ५० प्रतिनिधी पाहिजेत असे विधान जरांगे पाटील यांनी यावेळ केले. तसेच त्यांनी आपण विद्यमान खासदारांचा गेम करणार असल्याचेही सांगितले.
मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला थेट इशारा देत सरकारचा जीव ज्या खुर्चीत आहे ती खुर्ची आम्हाला पाहीजे, त्यासाठी आम्ही तयारी करणार असल्याचे विधान केले. याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरेकरांनी माध्यामांसमोर बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. सोबतच जरांगे यांना आवाहन देखील केले.
प्रवीण दरेकर म्हणाले की, त्यांच्या (मनोज जरांगे) मनात पोटात जे होतं ते आता बाहेर आलं आहे. त्यांना सत्तेची आस लागलेली आहे. फक्त बोलायचं की मला सत्तेचं काही पडलेलं नाही. मग कोणाल निवडणून आणणार आणि कोणाला पाडणार हा विषय कशाचा आहे? कोणाला निवडणून आणणार आणि पाडणार यावरून कोणाच्या बाजूनं सुपारी घेतली याचं चित्रही समोर आलं आहे. मराठा समाजाने पाठबळ दिलं याचा अर्थ तुम्हाला कोणाला काहीही बोलण्याचा अधिकार दिलेला नाहीये.
तुम्हाला खुर्ची खेचायची आहे ना? मग तुम्ही पक्ष काढा, निवडणुका लढा किंवा महाविकास आघाडीला सलग्न घटकपक्ष व्हा…. निवडणुका लढवा, राज्याचे मुख्यमंत्री व्हा आणि या मुख्यमंत्र्यांना शक्य नाही ते, तुमचा आभ्यास खूप असेल तर तुम्ही करा, असेही दरेकर म्हणाले.
मला वाटतं की मराठा समाजाला देखील याचा उबग आणि किळस आली आहे की, आंदोलनामागील सत्य आता समोर येत आहे. मराठा समाजाचे लोक फोन करतात की त्यांना देखील दुखः होतंय की मराठा समाजाच्या भावनांचा वापर करून जरांगे राजकारण करत आहेत, असं लोक बोलू लागले आहेत असेही प्रविण दरेकर म्हणाले.