मनोज जरांगे पाटील यांची मोठी मागणी? हिंदी भाषेच्या सक्तीबाबत नेमकं काय म्हणाले?

शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली आहे, यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा सक्तीची असावी किंवा नाही? यावर जोरदार चर्चा सुरू आहे. याविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेकडून हिंदीच्या सक्तीला विरोध होता आहे. दरम्यान यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. मराठी भाषा असली पाहिजे. हिंदी भाषेची सक्ती नको, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

मनोज जरांगे पाटील यांनी देखील हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला आहे, मराठी भाषा असली पाहिजे. हिंदी भाषेची सक्ती नको, परराज्यात गेल्यास त्यांची भाषा कळते का? असा सवाल यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. राजकीय हेतूसाठी गुंडांच्या टोळ्या चालवत आहेत. ठरवून सहआरोपी वाचवण्यात आले. हत्येतील आरोपी 15 दिवस बाहेर होते. 20 वर्ष वाल्मिक कराडचा वापर झाला आहे. अनेकांची हत्या केली, म्हणून वाल्मिक कराडची सुपारी दिली असावी असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी यावेळी निशाणा साधला. अधिकारी कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत, पण मीपण त्यांच्या मागेच लागणार आहे. जे प्रमाणपत्र देत नाहीत, त्यांना निलंबित केल्याशिवाय राहणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही, शेतकऱ्यांचा सय्यम सुटला तर ते नेत्यांच्या गाड्या फोडतील, विनाकारण लोकांना त्रास देऊ नका. शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. त्यांना तांब्याभर पाणी सुद्धा मिळत नाहीये.

जायकवाडीच्या धरणामुळे लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली असती पण यांनी, सरळ पाट बनवले, नागमोडी पाट काढले असते तर नांदेडपर्यंत पाणी मिळालं असतं. लोकांचा समस्या सुटल्या नाहीत तर हे मार खातील असा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)