काही भंगार लोक जवळ पाळून उभ्या जातीला डाग लागून घेतला, मनोज जरांगे जोरदार टीका

दिवंगत संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर अडचणीत सापडलेल्या देशमुख कुटुंबिय मुख्यमंत्र्‍यांनी कालच भेटले आहे. मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाला न्याय देतील आणि गुन्हेगारी मोडून काढतील अशी आशा आहे असे मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.खंडणीचे नेटवर्क केवळ परळी पुरते नाही तर लांबपर्यंत पसरलेले आहे. बरेच लोक आता गुंडांच्या समर्थनार्थ आंदोलन करीत आहेत. फडणवीस यांनी कुटुंबाला काय आश्वासन दिले ते मला माहिती नाही.परंतू विधानसभेत त्यांनी सर्व आरोपींना पकडू असे आश्वासन दिले होते. आता पकडतात की नाटक करतात हे पाहूयात असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.

पुन्हा उपोषणाची घोषणा…

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा २५ जानेवारीपासून अंतरावाली सराटीत आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. या उपोषणाला राज्यभरातून माणसं येणार असल्याने अंतरवाली सराटी येथील जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या जागेचा शोध घेण्यात येणार असून अंतरावाली सराटीतही काही मंडळी उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांची कायम आहे. तसेच कुणबी म्हणून असलेल्या नोंदी शोधण्यास सरकारने सहकार्य करावे तसेच इतर मागण्या मनोज जरांगे यांनी केल्या आहेत.

 लक्ष्मण हाके यांना उत्तर

संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बरोबर पुण्यात राजगुरू नगरमध्ये दोन मुलींची हत्या झाली होती. परंतू महाराष्ट्र मध्ये गुन्हेगारांची जात शोधून त्यांना आरोपीच्या कठड्यात उभे करत आहे. जरांगे यांची भाषा आता सुरेश धस करत आहेत. अंतरवाली सराटीमध्ये गोळीबार झाला त्यावेळी बीडमध्ये जाळपोळ झाली, त्यावेळी सुरेश धस यांना दिसले नाही का ..? बंदुकी दिसल्या नाही का? अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. त्यावर जरांगे यांनी विचारले असता त्यांनी लक्षण हाके यांना आम्ही विरोधक मानत नाही. नाही तर झोडता आम्हालाही येते. हाके आणि आमचा काही संबंध नाही.काहींना सवय असते..जित्याची खोड, मेल्याशिवाय जात नाही असे जरांगे यांनी म्हटले आहे.

उभ्या जातीला डाग लागून घेतला…

धनंजय मुंडे यांच्याबद्दल विचारला असता जरांगे यांनी आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला एकच माहीत आहे, जेवढे तपासात येतील तेवढे जेलमध्ये गेले पाहिजे.मग तो आमदार असो, मंत्री असो किंवा संत्री असो..सुट्टी नाही..इथे माजच उतरणार आहे. आतापर्यंत पचले आता पचणार नाही.तुमची होती चलती ती वेळ आता गेली आहे. हाताने पत घालवली यांनी. काही भंगार लोक जवळ पाळून उभ्या जातीला डाग लागून घेतला. तुम्ही खोलात जाणार आहात अशी टीका जरांगे यांनी केली आहे.

तळतळाट भयंकर असतो

तुम्ही लाभार्थी लोक एकत्र येत आहात, तुम्ही पूर्ण जातीला बदनाम करत आहात, पैसे वरबडायचे, कुणाचेही नरडे दाबायचे, हे जास्त दिवस टीकले नाही. कारण काय असते, नियतीला जास्त दिवस मान्य नसते, तळतळ खूप बेकार असते ! एकदा गरीबांचे हाय लागली की, ती हाय आणि तो तळतळाट वाचू देत नाही, तळतळाट भयंकर असतो. त्या शापातून बाहेर निघणे अवघड असते असेही जरांगे यांनी म्हटले आहे.

गोपीनाथ मुंडे आणि यांची तुलना होणार नाही

गोपीनाथ मुंडे यांनी अशा टोळ्या नाही चालवल्या. गोपीनाथ मुंडे यांच्या मागे सर्व मराठा उभा होता आणि ते मराठा असो किंवा इतर जातीचे त्यांना संधी देऊन काम करायचे. गोपीनाथ मुंडे आणि यांची तुलना होणार नाही. मी काही त्यांचा काळ बघितला नाही, पण लोकं सांगतात म्हणून मी बोलत आहे. जात जरी कोणतीही असली, तरी लोक चांगलं काम करणाऱ्या बद्दल खरं बोलतात. गोपीनाथ मुंडे यांनी गरिबांना कसे वर उचलायचे, जातीवाद कसा पसरू द्यायचा नाही.त्यामुळे त्यांना लोक मानायचे. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा वलय आणि पत यांनी पूर्ण घालून टाकली आहे अशी टीका जरांगे यांनी केली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)