Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी टाकला नवा डाव, धनंजय मुंडेंबाबत आता नवी मागणी; महाराष्ट्राचं लक्ष लागलं

मनोज जरांगे आक्रमकImage Credit source: गुगल

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर खूनाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात असंतोष पसरला. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अखेर 84 दिवसांनी देवेंद्र फडणवीस सरकारने मंजूर केली. मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला. पण हा राजीनामा नेमका कोणत्या कारणावरून दिला, यावरून वाद उफळला आहे. त्यांच्या राजीनाम्यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. आमदार रोहित पवार असो वा सुरेश धस सर्वांनीच त्यांच्याविरोधात पुन्हा मोर्चा उघडला आहे. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा मोठी मागणी केली आहे. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची भीती आहे.

जरांगे पाटलांचा खणखणीत टोला

मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत करायला त्यांनी कुठे राजीनामा दिला, अशी चपराक जरांगे पाटील यांनी लगावली. अजित पवार आणि फडणवीस यांचे आभार त्यांनी मानले. त्यांनी लाथ घालून त्यांना हाकलून दिलं. मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर खंडणीची मिटिंग झाली. टवाळ पोरांना एकत्र करून त्यांना व्यसनाला लावायचे आणि खंडणी गोळा करायचे. हे अजितदादा आणि फडणवीस यांना माहीत नसायचं, असे जरांगे म्हणाले.

धनंजय मुंडेंना मुख्य आरोपी करा

लोकं गुन्हे करायचे आणि हे राजकीय गाद्यांवर बसायचे. मुंडे हे ३०२ मध्ये आहेत. त्यांना कमरेत लाथ घालून हाकललं. आता त्याची आमदारकी काढा. त्याला मुख्य आरोपी करा. सह आरोपी करू नका. कारण सर्व कट त्यांनी रचला. त्यांचे लोकं काय करतात हे त्यांना माहीत नाही असं नाही. तो खरमाडे का कोण आरोपी आहे, त्याने आता एकट्याच्या डोक्यावर पाप घेऊ नये. त्याने कुणासाठी काम केलं त्याचं नाव घ्यावं. एकट्याने डोक्यावर पाप घेऊन मरू नका. मुंडेंच्या डोक्यावरही पाप द्या, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. खरमाडे याच्या कुटुंबीयानेही मुंडेंचं नाव घेतलं पाहिजे. नाही तर तुमचा माणूस मरेल आणि हा इकडे परदेशात फिरेल, त्यामुळे कुटुंबीयांनी मागे हटू नये, असे जरांगे म्हणाले.

मुंडे हे खोटारडे, माजोरडे

अजितदादा आणि फडणवीस यांच्या लक्षात आलंय. मुंडे खोटारडे आहेत. हे माजोरडे आहेत, असा आरोप जरांगे यांनी केला. कालचे फोटो पाहून लोक हादरले. पण मुंडेंना पश्चात्ताप नाही. संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं त्यांना काही वाटत नाही. एवढे क्रूर फोटो आल्यानंतर मी राजीनामा देत आहे, असं म्हणायला हवं होतं. पण आजारी आहोत म्हणून राजीनामा दिल्याचं त्याने सांगितलं. आरोपींना लपवून ठेवणारे, गाड्या देणारे, पैसे देणारे या १०० ते १५० लोकांना सहआरोपी करा. मुंडेंना मुख्य आरोपी करा. यांची टोळी संपल्याशिवाय मार्ग निघणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

धनंजय मुंडे तुरूंगात जाणार

आरोपींना सांभाळणाऱ्या पोलिसांना सहआरोपी करा. नियती थांबणार नाही. एकना एक दिवस धनंजय मुंडे आतमध्ये जाणार. हे माजोरी लोक आहेत. तुम्हाला आम्ही जेलात घातल्याशिवया राहणार नाही. यांना वाटतं आमचं कोणीच काही करणार नाही. पण तुमचा बाप मनोज जरांगे बसला आहे. तुमच्या अर्ध्या टोळीला तुरुंगात टाकलं. आता तुम्हालाही आत टाकू, असा खणखणीत इशारा जरांगे यांनी दिला.

यांच्या टोळीत पोलीस अधिकारी आहे. हे गरिबांची केस घेत नाही. दादागिरी आणि मग्रुरीरीची सवय लागली आहे. देशमुखांचा खून करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता आमचा मोर्चा तिकडे वळणार आहे. कचकाच दाखवणार आहोत, असे जरांगे पाटील यांनी इशारा दिला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)