दुचाकी चालवताना मांजा अडकला, तरुणाचा गळ्याला पडले तब्बल 75 टाके; नाशिकमधील धक्कादायक घटना

मकरसंक्रांतीला अवघे काही दिवस शिल्लक आहे. मकरसंक्रात म्हटलं की पतंग उडवणे आलेच. गेल्या कित्येक वर्षांपासून मकरसंक्रातीपासून पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहेत. पण पतंगासोबत वापरला जाणारा नायलॉनचा मांजा हा दिवसेंदिवस घातक ठरताना दिसत आहे. नाशिक शहरात नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. या नायलॉन मांजामुळे एका २५ वर्षीय तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. या नायलॉन मांजामुळे तरुणाच्या गळ्यावर तब्बल 75 टाके पडले आहेत. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नाशिक शहरात मांजाची सर्रासपणे विक्री

नाशिक शहरात नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी घातलेली असताना देखील सर्रासपणे विक्री आणि वापर सुरू असल्याच पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांवर अक्षरशः तडीपारीपासून ते मोक्का लावण्यापर्यंत कारवाई सुरु आहेत. नाशिक शहरात दररोज मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र तरी देखील नाशिक शहरात मांजाची सर्रासपणे विक्री सुरू आहे. नाशिकमध्ये याचा तितक्याच प्रमाणात वापर केला जात आहे. याच घातक नायलॉन मांजामुळे नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय मुशरन सय्यदला गंभीर इजा झाली आहे.

 गळ्याला 75 टाके पडले

या घटनेत मुशरन सय्यदचा गळा चिरला गेल्याने त्याच्या गळ्याला 75 टाके पडले आहेत. त्याच्यावर नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पशुपक्षांप्रमाणेच मानवासाठी देखील हा नायलॉन मांजामुळे घातक ठरत आहे. सुदैवाने मुशरन सय्यद हा 25 वर्षीय तरुण दैव बलवत्तर म्हणून मृत्यूच्या दारातून परत आलाय. या नायलॉन मांजामुळे त्याच्या गळ्यापासून ते आतमध्ये असलेली मुख्य रक्तस्त्राव करणारी वाहिनीला चिर पडली आहे. मात्र तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्याला आयुष्य मिळालं आहे. हा तरुण किती प्रमाणात गंभीर जखमी झाला, त्याच्यावर कशा पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली, याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात शस्त्रक्रिया

नाशिक शहरातील एका कपड्याच्या दुकानात काम करणारा मुशरन सय्यद हा तरुण दुचाकीवरून घरी येत होता. त्यावेळी त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला आणि तिथेच चिरला गेला. त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत तो रस्त्यावरच कोसळला. त्याच अवस्थेत नागरिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी काही अडचणींमुळे त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याला आणखी एका दुसऱ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्यावर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्याला जीवदान मिळाले. या जखमी तरुणाच्या आईने देखील या संदर्भात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

नाशिक शहरासह जिल्हाभरात तब्बल 16 घटना घडल्या असून यामध्ये अनेकांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या आहेत. या नायलॉन मांजामुळे फक्त मानवासच नव्हे तर पशु पक्ष्यांना देखील इजा होत आहे. यात अनेक पशुपक्षी देखील मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे या नायलॉन मांजा संदर्भात अजून कठोर पावले उचलावीत अशी मागणी होऊ लागली आहे. नायलॉन मांजाने पतंगबाजीचा आनंद घेण्याच्या उत्साहात अनेक जण जखमी होत आहेत. त्यामुळे संक्रांतीला पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर टाळून साध्या मांजाचा वापर करून अशा घटनांना आपण रोखू शकतो, असे म्हटले जात आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)