Majhi Ladki Bahin Scheme : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

मुंबई : राज्य सरकारने नुकताच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ योजनेची घोषणा करण्यात आली. अशातच आता या योजनेत मोठा बदल करण्यात आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.

दरम्यान, या योजनेसाठी लाभार्थी महिलांच्या वयाची अट 60 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली होती. आता ती हटवण्यात आली असून वयोमार्यादा 65 वर्षे इतकी करण्यात आली आहे. तसेच जमिनीच्या मालकीची अट काढण्यात आली आहे.

राज्यविधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार ( 28 जून) रोजी) राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. येत्या तीन चार महिन्यामध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारचा अर्थसंकल्प महत्वाचा आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. त्यातील एक सर्वात महत्वाची योजना ती म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’. ही योजना जाहीर करून राज्य सरकारने महिला वर्गाला मोठं गिफ्ट दिले आहे.

अटी आणि लाभार्थी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील कमीतकमी 2,50,500 महिलांना याचा फायदा होणार असल्याची माहिती आहे.

कोणत्या महिलांना फायदा होणार ?

1) ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा त्या महिला महाराष्ट्राच्या रहिवाशी असणे गरजेचे आहे.
2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला योजनेचा लाभ घेऊ शकता
3) महिला या योजनेचा लाभ वयाच्या 21 व्या वर्षापासून ते 65 व्या वर्षापर्यंत घेऊ शकणार आहेत.
4) योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे.
5) जय महिलांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा अधिक नसावं

कोणत्या महिलांना लाभ घेता येणार नाही ?

1) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात कार्यरत आहेत. तसेच कुटुंबातील सदस्यांना सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन सुरू आहे अशा महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
2) ज्या कुटुंबातील सदस्य आयकर विभागात कर भरतात त्या कुटुंबातील महिला योजनेचा लाभ घरू शकत नाही.
3) ज्या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार आहेत. त्या महिला योजनेसाठी अपात्र ठरतील.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1) लाभार्थी महिलेचं आधार कार्ड
2) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/ महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला
3) कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
4) अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
5) रेशनकार्ड

अर्ज कसा करावा ?

1 जुलै पासून योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतला जाणार आहे. यासाठी अर्जदार महिलांना सेतु सुविधा केंद्राला संपर्क करावा लागेल. किंवा मोबाईल अॅपचा वापर करू शकता. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदार महिलेला दरमहा 1500 रु आधार लिंक केलेल्या बँक खात्यांत हस्तांतरीत केले जातील.