नियमावली कशासाठी?
सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ नागरिक या गृहप्रकल्पांत राहायला गेल्यानंतर त्यांना अपेक्षित सोयी-सुविधा उपलब्ध असाव्यात, या हेतूने ही नियमावली राज्यात लागू करण्यात आली आहे. सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठी गृहप्रकल्प उभारणाऱ्या विकासकांना नियमावलीचे काटेकोर पालन करावे लागणार आहे; तसेच सदनिकांच्या विक्री करारात तरतुदींचा समावेश करावा लागणार आहे.
काय आहेत महत्त्वाच्या तरतुदी?
– एका मजल्यापेक्षा अधिक उंचीच्या इमारतीला लिफ्ट आवश्यक.
– व्हीलचेअर किंवा तत्सम साधनांची मदत घेता येईल, अशी रचना असावी.
– इमारतीच्या आतील आणि बाहेरील भागात व्हीलचेअरवर कोणत्याही अडथळ्यांविना फिरता येईल, असे डिझाइन असावे.
– आवश्यक तिथे रॅम्पची व्यवस्था, मोठे दरवाजे आणि स्लायडिंगच्या दरवाजांना प्राधान्य हवे.
– दरवाजाचे हँडल्स, कड्या व्यवस्थित पकडता येतील, असे दणकट असावे.
– फर्निचर वजनाने हलके, दणकट आणि अणकुचीदार टोकरहीत असावे.
– लिफ्टला दृकश्राव्य व्यवस्था असावी, स्ट्रेचर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी एक लिफ्ट आवश्यक.
– दोन पायऱ्यांमध्ये फार अंतर नको, जिना बारा पायऱ्यांपेक्षा मोठा नको.
– स्वयंपाकघरात गॅस प्रतिरोधक यंत्रणा असावी. नैसर्गिक प्रकाश आणि व्हेंटिलेशन हवे.
– स्नानगृहात वॉशबेसिन, शॉवर, शौचालयात हँडल्स असावेत.
– शौचालयात न घसरणाऱ्या टाइल्स हव्या, दरवाजा बाहेर उघडणारा असावा.
– प्रत्येक सदनिकेत विजेची पर्यायी व्यवस्था असावी.
– इमारतीच्या परिसरात मुख्य दरवाजा, स्वच्छतागृहे, शयनगृहात अलार्मची स्वतंत्र बटणे असावीत.
– सुरक्षारक्षक ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित असावेत.
– आणीबाणीच्या काळात उपयुक्त ठरणारे संपर्क क्रमांक इमारतीत प्रदर्शित करावेत.
अन्यथा विकासकांवर कारवाई
या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे विकासकांना बंधनकारक आहे. ही नियमावली राज्यात लागू करण्यात आली आहे. आता विकासकांना या तरतुदींचा विक्री करारातही योग्य पद्धतीने समावेश करावा लागणार आहे. या नियमावलीचे पालन न केल्यास विकासकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.