मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा हवामान विभाग (IMD) कडून देण्यात आला आहे. निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्यावर गारपिटीसह पावसाचं संकट घोंगावत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावासानं हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. फळबागांचं मोठं नुकसानं झालं आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसानं झालं आहे, दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
काय आहे हवामान खात्याचा इशारा?
हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यात आहे. गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 45 किमी इतका असेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे, दरम्यान या काळात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात पावसाचा इशारा
पुणे आणि पिंपरी- चिंचवडला अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. हवामान खात्याने पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पिंपरी- चिंचवड शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अर्धा ते पाऊण तास झालेला पावसाने सखल भागात पाणी साचलं आहे. ऐन शाळा सुटण्याच्या वेळेत पाऊस झाल्याने शाळकरी मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं पुणेकरांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मेघगर्जनेसह पाऊस झाला. या पावसामुळे चांगलाच गोंधळ उडाला. आता हवामान विभागाकडून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, नांदेड आणि बीडमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.