विदर्भात पावसाची जोरदार हजेरी
दरम्यान, संपूर्ण विदर्भात पावसाने हजेरी लावली असून पुढील सलग पाच दिवस विदर्भात पाऊस मुक्काम करणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. आज राज्यात हलक्या व मध्यम सरींच्या शक्यता आहे. तर कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस होणार असून पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर पावसाची रिपरिप वाढेल, असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला.
१६ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट
दरम्यान आज दि १३ जून रोजी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता असून नगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि पुण्यासह राज्यातील १६ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात धाराशिव, लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून बीड नांदेड जिल्ह्यांमध्ये हलक्या व मध्यम सरींची हजेरी लागेल असा अंदाज आहे.
मुंबईत उकाडा वाढला
बुधवारी (१२ जून) चेंबूर, देवनार भागामध्ये तुरळक पाऊस पडला. उर्वरित मुंबईमध्ये फारसा शिडकावाही नसल्याने शहराचे तापमान पुन्हा चढले. वातावरणात वाढलेली आर्द्रता आणि पावसाचा अभाव यामुळे दिवसभर अस्वस्थ करणारी जाणीव मुंबईकरांमध्ये होती. कुलाबा येथे कमाल तापमानाचा पारा २४ तासांमध्ये २.३ अंशांनी चढला, तर सांताक्रूझ येथे १.३ अंशांनी मंगळवारपेक्षा बुधवारचे तापमान अधिक नोंदले गेले. दोन्ही केंद्रांवर आर्द्रता दिवसभरात ७० टक्क्यांच्या आसपास असल्याने पावसामध्ये आगमनालाच आलेल्या व्यत्ययाचा मुंबईकरांना त्रास होत आहे.