Maharashtra Rain Update: नागरिकांनो सावधान! २२ जूनला जोरदार पावसाचा इशारा, भारतीय हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई : नागरिकांनो घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या भागात कधी आणि किती पाऊस पडणार याबाबत अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने शनिवारी महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्याच्या मध्यवर्ती भागांत मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्यांत सुद्धा पाऊस धुवांधार हजेरी लावणार असल्याचे विभागाने सांगितले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जूनच्या मध्यापर्यंत पावसाने राज्यातील बहुतेक भागांत हजेरी लावली आहे. परिणामी नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पावसाची स्थिती पुढेही अशीच राहिली तर बळीराजासाठी हे आशादायी असणार आहे. बळीराजाने शेतीतील कामांचा शुभारंभ केलाच आहे पावसाने जर सातत्य राखले तर शेतीपिकांसाठी ते लाभदायी ठरणार आहे.

कसे असणार हवामान

महाराष्ट्रात मध्य भागांत २२ जूनला मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे. यादरम्यान ६४.५ मिमी ते २०४.४ मिमी सह जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सूचित केले आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना सतर्क राहावे लागणार आहे.

हवामान तज्ज्ञ काय सांगतात?

राज्यातील पावसाची स्थिती आशादायी असून पुढील ४ आठवडे मान्सूनचा पाऊस हजेरी लावणार आहे. हे महाराष्ट्रातील हवामानात चांगली सुधारणा होणार असल्याचे दर्शवते. परिणामी राज्यात पाऊस हळूहळू वाढण्याची आणि जून महिन्याच्या अखेर पावसाचा वेग वाढणार असल्याची शक्यता आहे, असे हवामान तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये देखील ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्यांत सुद्धा शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नेऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे देशातील सर्वंच भागांत यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावली होती. काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह पाऊस पडल्याने शेतीसह साधन सामग्रीचे नुकसान झाले. यातच आता हवामान विभागाने मुसळधार व अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याचे सूचित केले आहे.