पुणे पोलिसांनी जानेवारी २०१८ मध्ये बिटकॉइन संदर्भातील पहिला खटला दाखल केला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती वाढली. या गुन्ह्यात एका माजी ‘आयपीएस’ अधिकाऱ्यालाही अटक झाली. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना मदत करणारे काही जण गजाआड झाले होते. याच दरम्यान पुण्यातील पोलिसांकडे ‘भाईचंद हिराचंद रायसोनी’ अर्थात ‘बीएचआर’ पतसंस्थेच्या अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराचा तपास सुरू होता.
याशिवाय अन्य एका प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील विद्यमान मंत्र्याला अटक करण्याचे घाटत होते. या सर्व प्रकरणांची राज्यभर जोरदार चर्चा झडली होती. या प्रकरणांशी निगडित पोलीस अधिकाऱ्यांमध्ये सध्या वर्चस्वावरून लढाई सुरू असून, या शीतयुद्धात अनेक कनिष्ठ अधिकारी होरपळत आहेत. राज्य सरकारकडून नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्येही त्याचे प्रतिबिंब उमटले आहे.
लवकरच पोलीस अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यांमध्ये याचा प्रत्यय येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आयपीएस अधिकाऱ्यांच्या कथित गैरप्रकारांच्या अर्जांची तातडीने दखल घेण्यात आली असून, गोपनीय तपास सुरू करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येणारी ‘क्लोज इन्क्वायरी’ (गोपनीय चौकशी) बंद केली. त्याचा फायदा सध्या काही ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांना होत आहे. गोपनीय चौकशीच्या नावाखाली होणारे गैरप्रकार यामुळे टळल्याचा निश्वास त्यांनी सोडला असला, तरी त्यांच्यावरील चौकशीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र आहे.
हा सर्व प्रकार सुरू असताना पुणे पोलिसांनी अचानक माजी पोलिस आयुक्तांच्या कार्यकाळातील काही घटनांचा तपास सुरू केला असून, त्याचा गोपनीय अहवाल सरकार; तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सादर केल्याचे समजते. या सर्व घटनांमध्ये अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी भरडले गेले असून एकूणच उच्चपदस्थ ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष पुणे पोलिस दलासाठी त्रासदायक ठरत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या शीतयुद्धाला अधिक धुमारे फुटणार की हे पेल्यातील वादळ ठरणार, हे स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
नेत्यांचे सबुरीचे धोरण
हा सर्व प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्ञात असला, तरी त्यांनी सध्या त्यावर मौन बाळगणे पसंत केले आहे. त्यामुळे ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांमधील अस्वस्थता वाढली असून, काही जणांनी हा प्रकार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कानावरही घातल्याचे समजते. त्यावर पवारांनी त्यांना थोडे दिवस शांत राहण्याचा सल्ला दिल्याचे समजते.