Maharashtra Breaking News LIVE 22 April 2025 : बुलढाण्यातील केसगळती, नखं गळती प्रकरणी केंद्रीय पथक गावांना देणार भेट

बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांमध्ये केसगळतीनंतर आता रुग्णांमध्ये नखगळतीचीही लक्षणं आढळून येत असल्याने केंद्र सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या नऊ विभागांतील तज्ज्ञांचं पथक आज जिल्ह्यात दाखल होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली आहे. हे पथक बाधित गावांतील रुग्णांना प्रत्यक्ष भेटून तपासणी करणार आहे. तिथल्या तथ्य संकलनाच्या माध्यमातून या आजारामागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यातील पहुरजिरा, कालवड, कठोरा, भोनगाव, बोंडगाव, तसेच शेगाव सह नांदुरा तालुक्यातील १३ गावांमध्ये केसगळतीचे प्रकार समोर आले होते. विशेष म्हणजे केसगळतीनंतर काही रुग्णांमध्ये नखगळतीचंही प्रमाण वाढल्याचं निदर्शनास आलं. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सकाळी 9 वाजता मुंबईतल्या नरिमन पॉईंट इथल्या भाजपच्या पक्ष कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)