Maharashtra Breaking News LIVE 11 February 2025 : संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपी पळून जाताना CCTV मध्ये कैद
  • 11 Feb 2025 08:29 AM (IST)

    पुणे- आयुष्मान कार्डसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम

    पुणे- आयुष्मान कार्डसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील आयुष्मान भारत- प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांपैकी ५२ लाख लाभार्थ्यांचे ई-कार्ड तयार झालेले नाहीत. जिल्ह्यातील राहिलेल्या लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड लवकरात लवकर ई-केवायसी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

  • 11 Feb 2025 08:26 AM (IST)

    नाशिकचे 60 प्रमुख अधिकारी प्रयागराज पाहणी दौऱ्यावर जाणार

    नाशिकचे 60 प्रमुख अधिकारी प्रयागराज पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. 17 तारखेपासून प्रयागराज पाहणी दौऱ्यासाठी अधिकारी निघणार आहेत. क्राऊड मॅनेजमेंट आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्यक्ष दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने मंत्रालयातील आणि स्थानिक पातळीवर काम करणारे 60 अधिकारी दौऱ्यावर जाणार आहेत. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधारण अडीच वर्ष शिल्लक आहे. नाशिकच्या सिंहस्थदरम्यान एकाच दिवशी दोन ते तीन कोटी भाविक येण्याची शक्यता आहे.

  • 11 Feb 2025 08:24 AM (IST)

    बीड- चौथ्या टप्प्यात 127 शस्त्र परवाने रद्द

    बीड: आतापर्यंत 310 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. पोलिसांच्या प्रस्तावानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली. पहिल्या टप्प्यात 100, दुसऱ्या टप्प्यात 60, तिसऱ्या टप्यात 23 तर चौथ्या टप्प्यात 127 परवाने रद्द करण्यात आले. शस्त्र परवाना रद्दचा आकडा 500 वर जाण्याची शक्यता आहे.

  • 11 Feb 2025 08:16 AM (IST)

    बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकणात आरोपी पळून जाताना सीसीटीव्हीत कैद

    बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकणात नवी माहिती समोर आली आहे. हत्येनंतर आरोपी काळ्या स्कॉर्पिओ गाडीमधून पळून जातानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी इथून आरोपी पळून गेले. गाडीत एकूण सहा आरोपी होते. केज पोलीस आरोपींच्या गाडीचा पाठलाग करत होते, तर वाशी चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलिसांची माहिती मिळताच आरोपी गाडी सोडून पळून गेले.

  • 11 Feb 2025 08:15 AM (IST)

    ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे रेल्वे

    पुणे- दिल्लीत होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशी रेल्वे गाडी धावणार, अशी माहिती मध्ये रेल्वे पुणे विभागाकडून पत्रकाद्वारे देण्यात आली. यंदाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद राजधानी दिल्लीकरांकडे आहे. त्यामुळे विशेष रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी साहित्यिकांकडून करण्यात येत होती.

    दरम्यान, याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष रेल्वे सोडण्यात यावी, अशी विनंती रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. त्यानुसार १९ फेब्रुवारीला पुणे ते दिल्ली-सफदरजंग ही रेल्वे दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. तर रविवारी (२३ फेब्रुवारी) दिल्ली सफदरजंग स्थानकावरून रात्री १०.३० वाजता पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.

  • 11 Feb 2025 08:13 AM (IST)

    पुण्यात जीबीएसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू

    पुण्यात जीबीएसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ३७ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण हा बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगरमधील रहिवासी होता आणि वाहनचालक म्हणून काम करीत होता. या रुग्णाला ३१ जानेवारीपासून अशक्तपणा जाणवत होता. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सात झाली आहे.

  • 11 Feb 2025 08:10 AM (IST)

    राज्यात आजपासून बारावीची परीक्षा सुरू

    राज्य मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. राज्य मंडळाकडून 271 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत.

  • (सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)