Maharashtra Assembly Election Results : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार; मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी? समोर आली मोठी अपडेट

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालं आहे तर महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट झाली आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे उमेदवार जवळपास 130 जागांवर आघाडीवर आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार 54 जागांवर आघाडीवर आहेत, दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील जोरदार मुसंडी मारली आहे.  40 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र दुसरीकेड महाविकास आघाडीला जबर पराभवाचा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख घटक पक्ष मिळून 75 चा आकडा देखील गाठू शकलेले नाहीत. दरम्यान आता उत्सुकता निर्माण झाली आहे ती म्हणजे नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार त्याची.

दरम्यान नव्या सरकारच्या शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. वानखेडे स्डेडियम किंवा शिवाजी पार्कवर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार? मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचा पराभव 

महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला आहे. संगमनेरमधून काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. तर दुसरीकडे तिवसामधून यशोमती ठाकूर यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील पिछाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसप्रमाणेच शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या देखील दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला आहे.

फडणवीसांची प्रतिक्रिया  

दरम्यान आजच्या निकालावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एखाद्याला जर जाणून बुजून टार्गेट करण्यात आलं तर ते लोकांच्या लक्षात येतं. महाविकास आघाडीनं फेक नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला पण यावेळी तो फसला, महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)