महाराष्ट्र विधानसभेला लवकरच विरोधी पक्षनेता मिळू शकतो. विधानसभेत विरोधी पक्ष नेता निवडीसाठी ठराविक एक संख्याबळाची गरज नाहीय. विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमात कोणतीही विशिष्ट तरतूद नाहीय. विधीमंडळाकडून ठाकरे गटाला पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. ठाकरे गटासाठी विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग मोकळा झालाय अशी चर्चा आहे. विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात कायद्यातील तरतुदींची माहिती द्यावी यासाठी 25 नोव्हेंबर 2024 रोजी ठाकरे गटाने विधिमंडळाला पत्र लिहिलं होतं.
या पत्राला विधिमंडळाकडून उत्तर देण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे, भास्कर जाधव यांनी हे पत्र दिलं होतं. भास्कर जाधव यांना विधिमंडळाने पत्राद्वारे उत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमात कोणतीही विशिष्ट तरतूद नसल्याच म्हटलं आहे. प्रचलित संसदीय प्रथा आणि परंपरा यांचा विचार करून विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत असतात अशी माहिती विधिमंडळाकडून देण्यात आली आहे.
ठाकरे गट आज विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार का?
त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी 10 टक्के विधानसभा सदस्य संख्या असावी लागते या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. विधिमंडळाच्या या उत्तरानंतर ठाकरे गट लवकरच विरोधी पक्षनेते पदासाठीचा अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. आजपासून विधिमंडळाच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. ठाकरे गट आजच विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज देऊ शकतो.
विधानसभेत मविआच संख्याबळ किती?
ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग आहे. महाविकास आघाडीत सर्वाधिक 20 आमदार ठाकरे गटाचे आहेत. त्या खालोखाल काँग्रेसचे 16 आणि शरद पवार यांच्या गटाचे 10 आमदार आहेत. विधानसभेत मविआच एकूण मिळून संख्याबळ 46 आहे. यात ठाकरे गटाची संख्या जास्त असल्याने विधानसभा अध्यक्षांनी मान्य केल्यास त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं.