महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका हिंदीपासून नाही तर… संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट काय?

संजय राऊत यांचा घणाघातImage Credit source: टीव्ही ९ मराठी

महाराष्ट्र आणि मराठीला हिंदीपासून धोका नाही तर गुजरातीपासून धोका असल्याचा मोठा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला. संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत मराठीविषयी टिप्पणी केली होती. त्यांनी मुंबईतील विविध भागात वेगवेगळी भाषिक गट असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता हिंदीचे सक्तीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता मनसे आणि उद्धव ठाकरे गटात मराठीवरून रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी मनसेचे नाव न घेता पुन्हा एकदा निशाणा साधला.

मनसेवर साधला निशाणा

काल खासदार संजय राऊत यांनी मनसेचे नाव न घेता सागर बंगल्यावरून भाषिक वादासाठी सूत्र फिरल्याचा दावा केला होता. तर आज ही त्यांनी मनसेचे नाव न घेता पुन्हा निशाणा साधला. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी, हिंदी आणि इतर भाषांचा वाद घालण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला.

राज ठाकरे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. मराठी-हिंदी वाद चिघळत चालला आहे, असा प्रश्न प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी केल्यावर राऊतांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. हे सर्व ठरवून चाललं आहे, असे ते म्हणाले. महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी कोणता वाद निर्माण करता येईल, याच्यावर ‘कॅफे’ मध्ये खल झाला, असा चिमटा त्यांनी मनसेला काढला.

मराठीला धोका गुजरातीपासून

मुंबईत मराठीत पाहिजे यामध्ये कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नसल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका कुणापासून असेल तर हिंदीपासून नाही तर गुजरातीपासून आहे, असा दावा राऊत यांनी पत्र परिषदेत केला. लक्षात घ्या मराठी आणि महाराष्ट्राला सर्वाधिक धोका गुजराती लॉबीपासून आहे, असे त्यांनी पुन्हा सांगितले. संपूर्ण पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण करण्यात आल्याचा घणाघात त्यांनी घातला. भाजपाला वाईट वाटेल म्हणून त्याच्यावर कोणीच काही बोलत नसल्याचा थेट आरोप राऊतांनी केला. या मुद्दावर कॅफेत चर्चा होत आहे का? असा खोचक टोलाही त्यांनी मनसेला लगावला.

बातमी अपडेट होत आहे..

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)