नेत्यांच्या प्रचारसभा
राज्यातील मराठवाडा-विदर्भातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्वच प्रमुख नेत्यांनी चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यासह आजूबाजूच्या लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले होते. बारामतीची लोकसभा निवडणूक झाल्यावर शरद पवार यांनीही शिरूर आणि मावळमध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. शुक्रवारी अचानक आलेल्या वळवाच्या पावसामुळे काही सभा-रोड शो रद्द झाल्याने शनिवारी बऱ्याच नेत्यांनी सकाळी आणि दुपारी तीन-चारपर्यंतच प्रचारसभा घेतल्या.
प्रशासकीय सज्जता
पुण्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये २० लाखांपेक्षा अधिक मतदार असून सोमवारच्या (१३ मे) मतदानासाठी सर्व प्रशासकीय प्रक्रिया सज्ज झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात २५ लाखांहून अधिक मतदार आहेत, तर पुण्याची मतदारसंख्या २० लाख आहे.
‘ब्रिटिशांना घालवले, मोदी काय चीज’
हडपसर : ‘एकेकाळी या देशामध्ये साम्राज्याचा सूर्य मावळत नव्हता, अशा ब्रिटिशांना देशातून घालवण्यासाठी महात्मा गांधींच्या विचाराने कोट्यवधी लोक एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिशांना देशाबाहेर घालवले. मग, मोदी काय चीज आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.
‘कमकुवत झाल्यावर पवार काँग्रेसमध्ये’
पुणे : शरद पवार यांचा पक्ष कमकुवत होतो, तेव्हा ते काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि नंतर परिस्थिती भक्कम झाल्यावर ते पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडतात, हेच पवार यांचे राजकारण राहिले आहे,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पवार यांना लक्ष्य केले. बारामतीच्या निवडणुकीत पराभव होणार याची कल्पना आल्यानंतर पवार यांची भूमिका बदलल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात त्यांनी पवार यांच्यावर टीका केली.
राज्यात ११ मतदारसंघात प्रचार संपला
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत शनिवारी प्रचाराची सांगता झाली. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सभा, प्रचारफेऱ्या, दुचाकी रॅली, रोड शो आदी माध्यमांतून मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. राज्यातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, शिर्डी, बीड आणि अहमदनगर या मतदारसंघांतील प्रचाराचा धुराळा शांत झाला.
देशातील ९६ मतदारसंघांचा समावेश
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशातील दहा राज्यांतील ९६ मतदारसंघांत सोमवारी (१३ मे) मतदान होणार आहे. तिथे शनिवारी प्रचाराची सांगता झाली. याशिवाय आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचीही शनिवारी सांगता झाली. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अखिलेश यादव (कनौज, उत्तर प्रदेश), केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह (बेगुसराय, बिहार), नित्यानंद राय (उज्जरपूर, बिहार), काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी (बहरामपूर, प. बंगाल), एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, आंध्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वाय. एस. शर्मिला आदी नेते रिंगणात आहेत.