एकीकडे महायुतीच्या दिग्गज नेत्यांची फौज प्रचाराच्या मैदानात उतरली असतानाच महाराष्ट्रात काँग्रेसकडून केवळ राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हातावर मोजण्याइतक्याच सभा झाल्या. त्यामुळे काँग्रेसच्या या यशात महाराष्ट्रातील प्रथम फळीतील नेत्यांची विशेष रणनीती फायदेशीर ठरली. यात काँग्रेसने प्रत्येक मतदारसंघनिहाय आपल्या नेत्यांवर विशेष जबाबदारी दिली. चंद्रपूरला विजय वडेट्टीवार, रामटेकसाठी सुनील केदार, अमरावती यशोमती ठाकूर, हातकणंगले सतेज पाटील, धुळे, नाशिक आणि शिर्डी मतदारसंघांसाठी बाळासाहेब थोरात याशिवाय भंडारा गोंदिया येथे नाना पटोले यांनी निवडणुकीची सर्व रणनीती आखून पक्षाला मोठे यश मिळवून दिले. त्यातच निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा आणि भारत जोडो यात्रा यांमुळे कार्यकर्त्यांना मिळालेली ऊर्जा या निवडणुकीत पक्षाला फायदेशीर ठरली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
– एकमेव खासदार असणारी काँग्रेस राज्यात पहिल्या क्रमांकावर
– विदर्भातील भाजपविरोधी लाटेचा फायदा
– भारत जोडो यात्रेमुळेही लाभ
– कार्यकर्त्यांना मिळाली नवी ऊर्जा
शेतकरी प्रश्नाबाबत रणनीती
काँग्रेसला या निवडणुकीत मिळालेल्या यशात विदर्भाचा वाटा महत्त्वाचा मानला जात आहे. विदर्भातील यशाबाबत काँग्रेसच्या नेते मंडळींनी दाखविलेली एकजूट कामी आल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे येथील अनेक मतदारसंघांत केंद्र सरकारविरोधात लाट होती. या अनुषंगाने काँग्रेसने रणनीती आखत या निवडणुकीत विजयाचा मार्ग सोपा केल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येते.
मुंबईतील यशही कौतुकास्पद
काँग्रेसच्या या यशात मुंबईत काँग्रेसला मिळालेली एक जागा सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. दक्षिण मध्य मुंबईसाठी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड इच्छुक असताना त्यांच्या वाट्याला उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ आला. मात्र वर्षा गायकवाड यांनी या ठिकाणी विजय मिळविला. काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेसचे अनेक बडे नेते पक्षाला सोडून गेलेले असतानाच मुंबईतील हे यश नक्कीच आगामी विधानसभा आणि पालिका निवडणुकीत पक्षाला नवी उभारी देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. परंतु या यशात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मिळालेली साथही मोलाची मानली जात आहे.