मुंबईमध्ये मतदान शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार करण्याचे धाडस कुणी करू नये, यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांमार्फत संचलन करण्यात आले. समाजकंटक, तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज देण्यात आली आहे. मतदानादिवशी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, दहशतवादविरोधी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात अधिक खबरदारी घेण्यात येणार आहे. दंगलनियंत्रण पथकाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली संपूर्ण मुंबईत पोलिस काम कर्तव्य बजावणार आहेत. कुणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
मतदान शांततेत पार पडण्यासाठी…
– ८,०८८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
– लाखोंचे अमली पदार्थ हस्तगत
– निवडणुका जाहीर झाल्यापासून विशेष मोहिमा
– पोलिसांकडून ‘ऑपरेशन ऑल आऊट’
– रेकॉर्डवरील, फरारी आरोपींची धरपकड
असा असेल फौजफाटा
– पाच अतिरिक्त पोलिस आयुक्त
– २५ पोलिस उपायुक्त
– ७७ सहायक पोलिस आयुक्त
– २,४७५ पोलिस अधिकारी आणि २२,१०० अंमलदार
– तीन दंगल नियंत्रण पथके
– १७० अधिकारी आणि ५,३६० अंमलदारांची अतिरिक्त कुमक
– ६,२०० होमगार्ड
– ३६ केंद्रीय सुरक्षा दले (सीएपीएफ/एसएपी)