जवळपास ६० टक्के उत्तर भारतीय, २० ते २२ टक्के मराठी व मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाचे वास्तव्य असलेला हा मतदारसंघ उत्तरेकडे गोरेगाव, दिंडोशी व जोगेश्वरी, मध्यभागी अंधेरी पूर्व व पश्चिम तर पश्चिमेकडे वर्सोवा किनारपट्टीपर्यंत पसरलेला आहे. मतदारसंघाची सध्याची एकूण मतदारसंख्या १७ लाख ३५ हजार ०८८ आहे. त्यात या पाच महिन्यांत २८ हजारहून अधिक मतदारांची भर पडली आहे. सर्वाधिक मतदारसंख्या आधी शिवसेनेच्या व आता सलग दोन निवडणुकांत भाजपच्या ताब्यात असलेल्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघात आहे.
लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास तो सत्तरीच्या दशकात दिवंगत राम जेठमलानींच्या रूपात सलग दोनदा जनता पार्टी व त्यानंतर दोन निवडणुका वगळल्यास काँग्रेसकडून सुनील दत्त यांची ओळख बनलेला राहिला आहे. यामुळेच एका पोटनिवडणुकीत त्यांची मुलगी प्रिया दत्तही येथून जिंकली. पुढे २००९ मध्येही तिनेच येथून बाजी मारली. २०१४ व २०१९ असे सलग दोन वेळा गजानन कीर्तिकर यांनी शिवसेनेकडून लढत येथे विजय मिळवला. २०१४च्या तुलनेत २०१९मध्ये त्यांचे मताधिक्य वाढले. हीच ओळख घेऊन त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर हे आघाडीकडून रिंगणात आहेत.
अमोल कीर्तिकर यांच्यासमोर ३५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या, चारवेळा नगरसेवक व तीनवेळा आमदार असलेल्या रवींद्र वायकर यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराचे आव्हान आहे. या लोकसभा मतदारसंघात शिवसेना रुजविण्यासाठी वायकर यांनी जिवाने रान केले आहे. त्या तुलनेत अमोल कीर्तिकर यांना राजकारणाचा थेट अनुभव नाही. परंतु यापूर्वी वडिलांसाठी केलेला प्रचार, त्याचे नियोजन व यामुळे संपूर्ण मतदारसंघाची त्यांना असलेली जाण किंचित अधिक आहे. तसेच लोकसभेचे तिकीट मिळणार, हे अमोल कीर्तिकर यांना वर्षभर आधीपासून माहित होते. त्यामुळे प्रचारातही त्यांनी आघाडी घेतली आहे. जवळपास प्रत्येक वस्ती, भाग त्यांनी पिंजून काढला आहे. वडील शिवसेनेत असले तरीही, त्यांच्या खासदारकीच्या काळात झालेल्या कामांचा प्रचार करण्याची संधी अमोल कीर्तिकर यांना मिळत आहे.
निवडणूक जिंकण्याचा भरभक्कम अनुभव रवींद्र वायकर यांच्या पाठीशी आहे. मोठा जनसंपर्क व केलेल्या कामाची छाप, हा प्रभाव जोगेश्वरी व दिंडोशीपुरता मर्यादित आहे. या स्थितीत महायुतीअंतर्गत तिकीट ३० एप्रिलला ऐनवेळी घोषित झाल्यानंतर जेमतेम १७ दिवसांत अन्य चार विधानसभा मतदारसंघांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान वायकरांपुढे आहे. मात्र जोगेश्वरीचा मागील २० वर्षांत केलेला कायापालट, हीच उमेदवार या नात्याने खरी ओळख असून असेच काम दिल्लीत पोहोचून करून दाखविण्याचा प्रबळ आत्मविश्वास ते प्रचारात दाखवत आहेत.
सहकारी पक्षांच्या मदतीचा विचार केल्यास येथे अमोल कीर्तिकर यांना आघाडीची साथ अधिक आहे. त्यांच्या प्रचारफेरीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार, आप, माकप असे सर्वच घटक पक्ष आवर्जून उपस्थित असतात. त्या तुलनेत रवींद्र वायकर यांच्या प्रचारफेरीत प्रमुख घटक पक्ष भाजपसह मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्ष नाममात्र उपस्थित असतो. ‘भाजप माझ्यासाठी जोमाने काम करतेय’, असा दावा वायकर करीत असले तरीही प्रचारफेऱ्यांत ते चित्र दिसून येत नसल्याचे वास्तव आहे.
देशात असलेले सत्तापक्षाच्या दिशेचे वारे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षात असताना वायकरांना जाणूनबुजून गोवण्याचा झालेला प्रयत्न व त्यामुळेच नाईलाजास्तव बदललेला गट आणि काम तडीस नेण्याचा त्यांचा इतिहास, या बाजूंवर वायकर पुढे जात आहेत. त्याचवेळी दुसरीकडे आधीपासून केलेला प्रचार, उद्धव ठाकरे यांच्याबाबत असलेली सहानुभूती आणि वडिलांनी मतदारसंघात केलेली कामे, यावर अमोल कीर्तिकर पुढे जात आहेत. त्यातूनच ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
प्रचाराचे मुद्दे
अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारफेरीत १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इक्बाल मुसा चौहान दिसल्याने वाद निर्माण झाला आहे. महायुतीकडून टीकेला सुरुवात झाल्याने तो मुद्दा प्रचारात तापला आहे. त्याशिवाय विमानतळ फनेल झोन, वेसाव्याकडील सीआरझेड व कोळीवाडा विकास, वाहतूककोंडी, डोंगराकडील वन विभागाचे प्रश्न, रुग्णालये हे मुद्दे प्रचारात आहेत.
दोन विधानसभा मतदारसंघ निर्णायक
या लोकसभा मतदारसंघातील दिंडोशी व वर्सोवा, हे दोन मतदारसंघ निर्णायक ठरणार आहेत. दिंडोशी मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील आमदार आहेत. मात्र ते अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारात फार सहभागी दिसून येत नाहीत. वर्सोवा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार असल्या तरीही त्यांच्या मताधिक्क्यात २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये मोठी घट झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राजूल पटेल यांच्या बंडखोरीमुळे २०१९च्या विधानसभेत युती असतानाही भाजपच्या आमदार भारती लवेकर यांच्या मतांत घट झाली होती. आता राजूल पटेल या अमोल कीर्तिकरांसाठी जोमाने प्रचार करीत असतानाच येथील काँग्रेसचे माजी आमदार बलदेव खोसा हे कीर्तिकर यांच्यासोबत आहेत. त्यामुळेच हे दोन मतदारसंघ निर्णायक ठरणार आहेत.
विद्यमान आमदार मतदारसंघ पक्ष मताधिक्य (टक्क्यांत)
विद्या ठाकूर गोरेगाव भाजप ३३
दिंडोशी सुनील प्रभू शिवसेना (उबाठा) ५२
जोगेश्वरी पूर्व रवींद्र वायकर शिवसेना ४२
अंधेरी पूर्व ऋतूजा लटके शिवसेना (उबाठा) १९ (पोटनिवडणूक)
अंधेरी पश्चिम अमित साटम भाजप १४
वर्सोवा भारती लव्हेकर भाजप ४
लोकसभा निवडणूक
वर्ष विजयी उमेदवार पक्ष मताधिक्य
१९९९ सुनील दत्त काँग्रेस १२
२००४ सुनील दत्त काँग्रेस ६
२००९ गुरूदास कामत काँग्रेस १५
२०१४ गजानन कीर्तिकर शिवसेना ३९
२०१९ गजानन कीर्तिकर शिवसेना ४५