महाविकास आघाडीत ठाकरे गटाने परस्पर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीत चांगलाच रंग भरला होता. काँग्रेस हद्दपार होण्याच्या चर्चेने विशाल यांना बंडाचा झेंडा हाती घ्यावा लागला. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याने चंद्रहार एकाकी पडले. दुसरीकडे संजयकाकांना पक्षांतर्गत संघर्ष करावा लागला, त्याचा परिणाम निकालात दिसून आला. जत विधानसभा मतदारसंघ वगळता सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी या पाच मतदारसंघात विशाल पाटील यांनाच मताधिक्य मिळाले.
प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी पहिल्या फेरीपासून मतांची आघाडी घेण्यास सुरुवात केली. ती भाजपचे संजयकाका पाटील यांना तोडता आली नाही. विशेष म्हणजे टपाली मतदान विशाल पाटील यांनी अडीच हजार मतांनी आघाडी घेतली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला. मात्र पहिल्या फेरीमध्ये संजयकाका पिछाडीवर गेल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दुसर्या फेरीपासून विशाल पाटील यांचे मताधिक्य वाढतच गेले. त्यामुळे सांगली शहरातील काँग्रेस कमिटीसह जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. दुपारी एक वाजेपर्यंत विशाल पाटील यांना सुमारे ४० हजार इतके मताधिक्य मिळाले होते. सातव्या फेरीत विशाल पाटील यांचे २३१८ मताधिक्य घटले. मात्र २८ हजार ११६ मतांची आघाडी कायम राहिली. दहाव्या फेरीअखेर विशाल पाटील यांना २ लाख ५९ हजार ६०५ इतकी मते मिळाली. संजय काकांना २ लाख १२ हजार ४९५ मते मिळाली. त्यामुळे विशाल पाटील त्यांनी ४७ हजार ११० मतांनी आघाडी घेतली. पुढील अकराव्या फेर्यापासूनही विशाल यांचे मताधिक्य वाढतच गेले. पंधराव्या फेरीपर्यंत विशाल पाटील यांना ३ लाख ८८ हजार ५५५ तर भाजपचे संजय काका यांना ३ लाख २४ हजार २५१ मते मिळाली. पंधरा फेरीअखेर विशाल यांनी संजयकाकांवर ६४ हजार ३०४ मतांनी आघाडी घेतली.
सातवी आणि अठरावी फेरी वगळता सर्वच सर्व फेर्यामध्ये संजयकाकांना सरासरी ३ हजाराने मते कमी होत गेली, त्यामुळे भाजपचे संजयकाका यांच्या विरोधात निकाल असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले. मतमोजणीच्या सुरुवातीपासून भाजपचे संजयकाका यांना कुठेही मताधिक्य दिसत नसल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत नव्हता. परंतु त्यानंतरच्या सर्व फेर्यांमध्ये संजयकाकांचे मताधिक्य कमीच होत गेले. पंधराव्या फेरीपर्यंत मताधिक्य वाढत गेल्याने आपला विजय होणार नाही, याची खात्री होताच संजयकाकांचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्रातून निघून गेले.
शेवटच्या फेरीपर्यंत विशाल पाटलांची आघाडी कायम
मतमोजणीतील २५ पैकी दोन फेर्या वगळता अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी प्रत्येक फेरीमध्ये मताधिक्य घेतले. एकूण ११ लाख ५४ हजार २०६ मतांपैकी भाजपचे विशाल पाटील यांना ५ लाख ६९ हजार ६५१ मते मिळाली. संजयकाका पाटील यांना ४ लाख ६९ हजार ३९२ तर महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना अवघी ६० हजार ११५ इतकी मते मिळाली. त्यामुळे विशाल पाटील सुमारे १ लाख २५९ हजार मतांनी विजयी झाले.
संजयकाकांची हॅट्रिक हुकली
भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील हे तिरंगी लढतीत बाजी मारून हॅट्रिक करतील अशी अपेक्षा भाजपला होती. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रतीक पाटील यांच्यावर त्यांनी २ लाख ३९ हजार तर २०१९च्या निवडणुकीत विशाल पाटील यांचा १ लाख ६० हजार मतांनी पराभव केला होता. यावेळी देखील पुन्हा विशाल पाटील यांचा पराभव करण्याचा चंग बांधला होता, मात्र भाजपमधील अंतर्गत नाराजीमुळे संजयकाकांची हॅट्रिक हुकली.
मतमोजणी ठिकाणी विशाल पाटील यांची उपस्थिती
लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजामध्ये अपक्ष विशाल पाटील विजय होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे विशाल पाटील यांना विजयाची खात्री होती. त्यामुळे विशाल पाटील यांनी पत्नी पूजा यांच्यासह सकाळी सव्वासात वाजता मतमोजणी केंद्रात धाव घेतली होती. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत, पती-पत्नी मतदान केंद्रावर ठाण मांडून होते.
मतमोजणीला विलंब
सकाळी साडेआठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. परंतु ही मते मोजण्यास उशीर लागला. ९ वाजेपर्यंत पोस्टाच्या मतांची मोजणी सुरू होती. त्यामुळे प्रत्यक्ष ईव्हीएममधील मतमोजणीला तब्बल एक तास म्हणजे ९ नंतर सुरुवात झाली. राज्यातील विविध ठिकाणच्या निकालाच्या फेर्या गतीने जाहीर होत असताना सांगली लोकसभेची मतमोजणी मात्र अतिशय संथ गतीने सुरू होती. त्यामुळे अनेक मतदारसंघातील निकाल जाहीर झाल्यानंतरही सांगलीचा निकाल जाहीर करण्यास विलंब लागला. अंतिम फेरीचा निकाल येण्यास रात्र झाली होती.
सांगलीत उमेदवारनिहाय मिळालेली मत
विशाल पाटील अपक्ष ५,६९,६५१
संजयकाका पाटील भाजप ४,६९,३९२
चंद्रहार पाटील उबाठा ६०,१५५
टिपूसुलतान पटवेगार बसपा ५,५०२
महेश खराडे स्वाभिमानी ५,४९१
आनंद नलगे बळीराजा पार्टी ३,५३१
सतिश कदम हिंदुस्थान पार्टी २,८५१
प्रकाश शेंडगे अपक्ष ८,१५०
नोटा ६,५१२