शिवसेनेमधील बंड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांच्या मदतीने राज्यात स्थापन केलेले सरकार आणि शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट यामुळे महाविकास आघाडीसाठी मुंबईतील स्थिती प्रतिकूल अशीच होती. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीसमोर महायुतीचे कडवे आव्हान होते. मात्र, विनाविलंब जागावाटप, योग्य उमेदवार आणि आक्रमक प्रचार यामुळे महाविकास आघाडीने महायुतीचे आव्हान मोडून काढले. परिणामी, भाजपला सन २०१४नंतर प्रथमच मुंबईत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विजयाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला असून, आघाडीच्या गोटात जोरदार जल्लोष सुरू आहे.
– सन २०१४नंतरचा भाजपचा मोठा पराभव
– जागावाटप, प्रचार मुद्दे ठरले कळीचे
– पंतप्रधान मोदी यांची सभा, रोड शो निष्प्रभ
त्याच वेळी, राज्यातील महायुतीला विशेषत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्याचा महायुतीला किती फायदा झाला, याविषयी निवडणुक निकालाने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज ठाकरे यांच्या सभांमुळे नारायण राणे यांच्यासह महायुतीतील अनेक उमेदवार निवडून आल्याचा दावा मनसेचे पदाधिकारी करीत असले तरी ज्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे शिवतीर्थ निवासस्थान आहे त्याच मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला आहे. दादर माहीम मतदारसंघात मनसेचा सर्वाधिक जोर असताना, तसेच तेथील शिवाजी पार्कच्या मैदानात मनसेच्या स्थापनेची घोषणा राज ठाकरे यांनी केली असताना त्याच विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी मतांची आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे त्या मतदारसंघातही मनसे जर महायुतीच्या उमेदवाराला मतांची आघाडी मिळवून देत नाही, तर मग त्यांच्या बाकीच्या मतदारसंघातील मतांची नेमकी काय अवस्था असेल असा प्रश्न यानिमित्ताने विरोधक विचारत आहेत.