अजित पवारांना नाकारले
राज्यात महायुतीला जोरदार धक्का बसला असून, त्यांच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दहा जागांपैकी चार जागा पुणे जिल्ह्यातील आहेत. या चार जागांपैकी शरद पवार यांच्या पक्षाकडे असलेल्या दोन्हीही जागा त्यांनी कायम राखल्या आहेत. यानिमित्ताने अजित पवारांचा महायुतीत झालेला प्रवेश पुणेकरांना फारसा रूचला नसल्याचे प्रतिबिंब या निकालात उमटले आहे.
काँग्रेसला फायदा नाहीच
पुण्याची जागा काँग्रेसने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. राज्यभरात असलेल्या वातावरणाचा काँग्रेसला फायदा होत असल्याचा दावा प्रचारादरम्यान स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत होता. मात्र, निकालात पुणे शहरात काँग्रेसला फायदा झाल्याचे दिसून आले नाही. मागील निवडणुकीत भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांना तीन लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. यंदा भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य कमी झाले असले, तरी ते निर्णायक मते मिळवून विजयी झाले आहेत.
‘रामकृष्ण हरी; वाजवा तुतारी’
शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रचारामध्ये पहिल्या दिवसापासूनच घेतलेली आघाडी निकालातही स्पष्ट दिसली. त्यांच्या मताधिक्यात गत निवडणुकीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्यावर ‘डमी उमेदवार’ म्हणून त्यांनी केलेली टीका प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिली. ऐनवेळी पक्ष बदलल्याचाही फटका आढळराव यांना बसला. बारामतीची निवडणूक ही देशभरातील चर्चेचा विषय ठरला. ‘जय रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी’ या वाक्याने या निवडणुकीत रंगत आणली आणि सुप्रिया सुळे यांचा विजय सुकर झाला.
पुण्यात पुन्हा भाजपच
पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे तीच राहिली असून, पुणे वगळता गेल्या निवडणुकीचाच निकाल परत लागला आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. भाजपने मोहोळ यांना उमेदवारी दिली आणि मोहोळ यांनीही आपला विजय साकारला. अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील चित्र गतनिवडणुकीसारखेच कायम राहिले आहे.