सकाळपासूनच पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, बालेवाडी येथे मावळ; तसेच शिरूर लोकसभेसाठी रांजणगाव येथील एमआयडीसीच्या वखार महामंडळाच्या गोदामात मोजणी करण्यात आली. त्या ठिकाणीही फारसा गोंधळ झाला नाही.
कार्यकर्त्यांचे सकाळी ‘मॉर्निंग वॉक’
सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने कोरेगाव पार्क येथील गोदामापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर पोलिस, कार्यकर्त्यांसह पत्रकारांच्या वाहनांसाठी सुविधा केली होती. त्यामुळे सकाळीच गाडी लावून पत्रकारांसह कार्यकर्त्यांना पायपीट करावी लागली. अप्रत्यक्षपणे सकाळी ‘मॉर्निंग व़ॉक’ करावा लागल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
गेल्या लोकसभेच्या मतमोजणीच्या व्यवस्थेच्या तुलनेत यंदाची व्यवस्था ढिसाळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. दर वेळी माध्यमांना माहिती घेण्यासाठी मोजणी कक्षापर्यंत जावे लागत होते. मोजणी कक्ष आणि माध्यम कक्ष यांच्यात बरेच अंतर होते. त्याशिवाय माध्यमकक्षात मोजणीच्या फेऱ्यानिहाय माहिती देण्याची व्यवस्था नसल्याने जिल्हा प्रशासनाचे ढिसाळ नियोजन दिसून आले.
मतमोजणी प्रतिनिधी असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांकडून मोजणीच्या फेऱ्यानिहाय आकडेवारी उपलब्ध होत होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकंडून आकडेवारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने फेरीची मते जाहीर करण्यास विलंब झाल्याचे दिसून आले.