प्रतिनिधी, मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील नवमतदार (वय वर्षे १८ ते १९) १४ हजार १७२ ने वाढले आहेत. तर मतदारांच्या एकूण संख्येत १ लाख ४७ हजार १६६ ने वाढ झाली आहे. याद्वारे आता जिल्ह्यातील मतदारांची संख्या ७४ लाख ४८ हजार ३८३ च्या घरात गेली आहे. २० मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची अंतिम मतदार यादी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केली.मुंबई उपनगरात एकूण २६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी २४ विधानसभा मतदारसंघांत मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य व मुंबई उत्तर पूर्व, या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. तर दोन विधानसभा मतदारसंघ हे मुंबई शहर जिल्ह्याचा भाग असलेल्या मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात आहेत.
यानुसार, संपूर्ण उपनगराचा विचार केल्यास निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यावेळी (२१ मार्च २०२४) जिल्ह्यातील एकूण मतदारांचा आकडा ७३ लाख ०१ हजार २१७ इतका होता. तो आता ७४.४८ लाखांच्यावर गेला आहे. जिल्ह्यातील नवमतदारांचा आकडा ७० हजार ६५३ इतका होता. तो आता ८४ हजार ८२५ झाला आहे. त्याचवेळी दिव्यांग मतदारांचा आकडा मार्च महिन्यात १५ हजार ५०३ इतका होता. तो आता १६ हजार ११६ वर जात त्यात फक्त ६१३ ने वाढ झाली आहे.