Lok Sabha 2024: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी, पुण्यात रंगणार ‘नमो’ विरुद्ध ‘रागा’

प्रतिनिधी, पुणे : भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील प्रचारसभेची घोषणा झाल्यानंतर लगेचच काँग्रेसकडूनही राहुल गांधी यांच्या प्रचारसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. मोदी यांची पुण्यातील सभा येत्या सोमवारी (२९ एप्रिल) होणार असून, त्यानंतर येणाऱ्या शुक्रवारी (३ मे) राहुल गांधी यांची सभा ‘एसएसपीएमएस’च्या मैदानावर घेण्याचे नियोजन काँग्रेसने केले आहे. त्यामुळे पुण्यात ‘नमो’ विरुद्ध ‘रागा’ असा सामना पुढील आठवड्यात रंगणार आहे.राहुल गांधी यांच्या कार्यालयाकडून शहर काँग्रेसला तीन मे ही तारीख कळविण्यात आली आहे. या सभेची वेळ निश्चित होणे अद्याप बाकी आहे, तरी ही सभा शक्यतो सायंकाळी व्हावी, यासाठी शहर काँग्रेस आग्रही आहे. राहुल गांधी यांनी यापूर्वी आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी २०१४मध्ये पुण्यात सभा घेतली होती. ही सभा याच मैदानावर झाली होती. काँग्रेसने इतर मैदानांचीही चाचपणी केली असून, शैक्षणिक संस्थांनी मैदान देण्यास नकार दिल्याने ‘एसएसपीएमएस’वरच सभा घेण्यात येणार असल्याचे संकेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले.
‘नोटा’पेक्षा कमी मतं मिळणाऱ्यांवर पाच वर्ष बंदी घाला, सुप्रीम कोर्टात याचिका, निवडणूक आयोगाकडे चेंडू

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील राजकारण गेली काही दिवस स्थानिक मुद्द्यांच्या भोवती फिरत होते. या ठिकाणी आता मोदी आणि गांधी यांनी प्रचारात उडी घेतल्याने राष्ट्रीय मुद्द्यांवर ही निवडणूक नेण्याचा प्रयत्न दोन्ही पातळ्यांवरून होत असल्याचे चित्र आहे. गांधी यांची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा गेल्या शुक्रवारी सोलापूर येथे झाली. त्यानंतर पुणे येथे तीन मे, तर बारामती, कोल्हापूर येथेही सभा घेण्याचा प्रयत्न स्थानिक नेत्यांनी सुरू केल्याचे समजते.

ठाकरे ३० एप्रिलला वारज्यात

बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा वारजे येथे ३० एप्रिलला होत आहे. ही सभा मोदी यांच्या सभेच्या दिवशी म्हणजे २९ एप्रिललाच होणार होती. मात्र, या सभेची तारीख आता बदलण्यात आली असून, ही सभा ३० एप्रिलला होणार आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात ही सभा जाणीवपूर्वक घेण्यात आली आहे. वारज्यात भाजपचा प्रभाव राहिला असून, आतापर्यंत सुप्रिया सुळे यांना येथून कायमच फटका बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवता आले, तर ते मताधिक्य विजय मिळवून देवू शकतो, असा अजित पवारांचा प्रयत्न आहे. तर, खडकवासल्यातून महायुतीला मताधिक्य फारसे मिळू नये, यासाठी शरद पवारांकडून खेळी खेळण्यात येत आहे.