लोकसभेचे अध्यक्ष पद महत्त्वपूर्ण असते असे म्हणत राऊतांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे उदाहरण देत भाजपावर निशाणा साधला. शिवसेना बंडखोरीनंतर विधानसभेत राहुल नार्वेकरांनी पॉलिटिकल एजंट म्हणून भाजपाचे काम केले होते, त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली असा घणाघात राऊतांनी केलाय. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचा व्हीप बेकायदेशीर सांगितला, शिंदे यांची निवड बेकायदेशीर ठरवली, यासह राज्यपालांची संपूर्ण कार्यवाही बेकायदेशीर सांगितली तरी नार्वेकरांनी बनावट पद्धतीने निकाल घटनाबाह्य दिला असे म्हणत राऊतांनी भाजपला टोला मारला.
मोदींचे एनडीए सरकार टेकूवर उभे आहे त्यामुळे मोदींच्या मर्जीतील व्यक्तीला लोकसभा अध्यक्षपद मिळाले तर चंद्राबाबू आणि चिराग पासवान यांचा पक्ष मोदी फोडतील असे भाकित राऊतांनी वर्तवले आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या खासदारांपैकी कोणाला लोकसभेचे अध्यक्षपद मिळत असेल तर इंडिया आघाडीमध्ये चर्चा करु आणि उमेदवाराला पाठिंबा देवू. देशाने मोदींच्या झुंडशाहीला झिडकारले आहे. त्यामुळेच लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड योग्य झाली पाहिजे. घटनेतील तरतुदीनुसार लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधी बाकावर मिळायला हवे असे राऊत म्हणाले.
“पीएम मोदी यांचे सरकार एनडीए घटकपक्षांच्या आधारावर उभे आहे त्यामुळे मोदी काही दिवसाचे पाहुणे आहेत हेच मी वांरवार सांगतोय. मोदींचा काही सरकारमध्ये ताबा राहिलेला नाही कधीही सरकार कोसळू शकते राहुल गांधींनी सांगितले” असे राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले