मानव-बिबट्या संघर्ष
पुणे जिल्ह्यात जुन्नरसह आंबेगाव, मावळ, शिरूर भागांत बिबट्यांचा वावर आहे. यातील बहुतांश बिबटे सुरक्षित ठिकाण म्हणून आणि पिल्लांच्या संगोपनासाठी ऊसाच्या शेतात राहतात. ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाल्यावर शेतातील बिबटे इतरत्र जातात. या काळात आईपासून वेगळी झालेली बिबट्यांची पिल्लेही स्वतःची हद्द प्रस्थापित करण्यासाठी नवीन जागा शोधतात. अन्नाच्या शोधात अनेकदा ते मानवी वसाहतींजवळही जातात. पटकन मिळणाऱ्या खाद्यासाठी भटकी जनावरे, पाळीव जनावरे त्यांची शिकार ठरतात. मात्र, या काळात बिबट्या आणि मनुष्याचा सामना होतो. जखमी अवस्थेतील, अनेक दिवसांपासून उपाशी असलेला बिबट्याकडूनही मानवी वस्तीत शिरून प्राण्यांचा शोध घेतल्याचा प्रयत्न केला जातो.
हल्ल्यांचे प्रमाण वाढले
हद्दीच्या शोधात, तर कधी अन्नाच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्यांकडून माणसांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांत बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पूर्वी बिबट्याकडून पहाटे आणि रात्री हल्ले होत असत, अलीकडे दिवसाही वस्त्यांजवळ बिबट्याा फिरताना नागरिकांना दिसत आहेत. भटक्या श्वानांप्रमाणेच बिबट्यांकडूनही चालत्या गाड्यांवर झेप घेऊन नागरिकांवर हल्ल्याचे प्रयत्न झाले आहेत.
ग्रामस्थांमध्ये भीती
एकीकडे जुन्नरला बिबट सफारी सुरू करून स्थानिकांना पर्यटनातून रोजगार निर्माण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे. त्यातच बिबट्यांच्या वाढत्या घटनांमुळे गावकऱ्यांना त्यांच्याविषयी भीती वाटत आहे. हल्ला करणाऱ्या बिबट्यांना कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
वर्ष : मनुष्यहानी (मृत) : मनुष्य जखमी
प्रकरणाची संख्या : दिलेली नुकसान भरपाई : प्रकरणांची संख्या : दिलेली नुकसान भरपाई
२०१८ -१९ : २ : ३० लाख रुपये : ९ : २ लाख ७ हजार १११
२०१९ -२० : २ : ३० लाख रुपये : १० : २ लाख २९ हजार ४४९
२०२०- २१ : ३ : ४५ लाख रुपये : १४ : ९ लाख ६४ हजार ५८
२०२१ -२२ : १ : १५ लाख रुपये : ७ : ७ लाख ७२ हजार ८७८
२०२२ -२३ : ४ : ५५ लाख रुपये : २९ : १२ लाख ८५ हजार ६६५
२०२३ – २४ : ३ : –: १२ : – — नुकसान भरपाई प्रक्रिया सुरू
एकूण – १२ : १७ लाख ५० हजार रुपये : ६९ : ३४ लाख ५९ हजार १६१
बिबट्या नेहमी दिसतो, कारण…
– रात्री उशिरापर्यंत निर्मनुष्य भागातील वाहनांची, नागरिकांची वाढलेली वर्दळ.
– शेतात दिवसभर मनुष्यांचा वावर वाढला आहे.
– उपनगरांच्या सीमेवरील वाढलेले रस्त्यांचे जाळे.
– वाढत्या वाहनांमुळे वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारावर बंधने.
– भटक्या जनावरांच्या शोधात बिबट्या वस्त्यांजवळ येतात.
अभ्यासक म्हणतात…
बिबट्या हा काळानुसार स्वत:ला बदलणारा प्राणी आहे. विस्तारलेली उपनगरे, ग्रामीण भागांतील सार्वजनिक कचऱ्याची समस्या वाढली आहे. या कचऱ्यामुळे भटक्या प्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्या शोधात बिबट्या वस्त्यांजवळ येतो. मुबलक पाणी आणि मोकाट जनावरांचे मुबलक अन्न, ऊसाच्या शेतात सुरक्षित अधिवास असल्याने बिबट्यांची संख्या वाढत आहे. भटक्या प्राण्यांची संख्या कमी झाल्याशिवाय बिबट्यांचा वस्तीजवळील वावर कमी होणार नाही, असे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे.
जुन्नरमध्ये घडत असलेल्या प्रत्येक घटनांमागची कारणे वेगवेगळी आहेत. नुकत्याच घडलेल्या दोन्ही घटना गंभीर असून, स्थानिक वनाधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी पिंजरे बसवले असून, त्यांची संख्याही वाढविणार आहोत. संबंधित बिबट्याला मारण्यासाठी आम्ही नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला प्रस्ताव पाठवला आहे.
– एन. आर. प्रवीण, मुख्य वनसंरक्षक, पुणे विभाग
नसबंदीचा प्रस्ताव कागदावरच?
जुन्नर आणि लगतच्या भागांतील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन वन विभागाने त्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात, केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालय आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला प्रस्तावही पाठविण्यात आला होता. बिबट्यांच्या नसबंदीवरून अनेक चर्चा आणि वादविवादही रंगले, पण वर्ष उलटले, तरी प्रस्तावावर निर्णय झालेला नाही.