मुंबई: भारतीय निवडणूक आयोगाने ८ मे रोजी राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. यानुसार विधान परिषदेच्या २ शिक्षक आणि २ पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांसाठी १० जून रोजी मतदान होणार होते तर १३ जून रोजी मतमोजणी होणार होती. आता ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. आयोगाकडून नवे वेळापत्रक लवकरच जाजहीर केले जाणार आहे. या निवडणुका पुढे ढकलाव्यात यासाठी अनेक शिक्षक संघटनांनी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे.या निवडणुकीसाठी १० जून ही तारीख निश्चित करण्यात आल्याने मे महिन्याच्या सुट्टीसाठी बाहेर गेलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार नाही. यामुळे ही निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी शिक्षक भारतीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका देखील करण्यात आली होती. त्याच बरोबर शिक्षक संघटनांनी आयोगाला निवडणूक पुढे ढकलावी यासाठी निवेदन देखील दिले होते. राज्यात शिक्षण विभागाने २ मे १४ जून अशी सुट्टी जाहीर केली आहे. सर्व शिक्षक आणि कर्मचारी सुट्टीसाठी गावी गेले असल्याने ते ११ जूननंतर परत येतील. राज्यातील शाळा १५ जूननंतर सुरू होणार असल्याने शिक्षक आणि अन्य कर्मचारी मतदानापासून वंचित राहू शकतील असे संघटनेचे म्हणणे होते.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ), किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत.