सिझेरियन डिलिव्हरीनंतर काय खावे आणि काय खाऊ नये, काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या

आई होणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर भावना असते. अशातच डिलिव्हरीनंतर महिलेच्या आरोग्याची आणि मुलाच्या आरोग्याची काळजी खूप महत्वाचे असते. विशेषतः ज्यांची डिलिव्हरी सिझेरियन पद्धतीने होते. डिलिव्हरीचे दोन प्रकार असतात एक म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी आणि दुसरी म्हणजे सिझेरियन डिलिव्हरी. तर यामध्ये प्रत्येक स्त्रीला त्यांची डिलिव्हरी ही नॉर्मल म्हणजेच नैसर्गिक पद्धतीनेच व्हावी असे वाटत असते, कारण या डिलिव्हरी मध्ये जास्त धोका नसतो. तसेच काही दिवसात महिला पुन्हा तिचे दैनंदिन आयुष्य जगू शकते.

पण या उलट सिझेरियन डिलिव्हरी खूप त्रासदायक असते. जेव्हा डिलिव्हेरीच्या वेळेस काही समस्या येतात तेव्हा ऑपरेशन करून बाळाला बाहेर काढले जाते. त्यामुळे ही डिलिव्हरी कोणत्याही स्त्रीला नको असते,कारण या डिलिव्हरीनंतरच्या वेदना या असाह्य असतात. त्यासोबतच त्या महिलेला बरे होण्यासाठी काही दिवस वा महिन्यांचा कालावधी लागतो. सिझेरियन डिलिव्हरी नंतर महिलेची खुप काळजी घ्यावी लागते. तिच्या आहाराविषयी, खाण्याविषयी जास्त सतर्कता बाळगावी लागते. कारण या काळात कोणतीही चूक महिलेच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. सिझेरियन डिलिव्हरीनंतर काय खावे आणि काय खाऊ नये, तसेच स्वतःची काळजी कशी घ्यावी हे आपण आजच्या लेखातुन तज्ञांकडून जाणून घ्या

काय खावे आणि काय खाऊ नये?

जयपूरच्या स्त्रीरोगतज्ज्ञ प्रीती शर्मा यांनी सांगितले की, सी-सेक्शन म्हणजेच सिझेरियन डिलिव्हरीनंतर महिलेचे शरीर बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सिझेरियन झालेल्या महिलेने त्यांच्या आहारात सुरुवातीला हलके आणि सहज पचणारे अन्न खावे ज्यामध्ये खिचडी, भाज्यांचा सूप यांचा समावेश करावा. तसेच काही दिवसांनतर जेव्हा पचनक्रिया चांगली होते तेव्हा त्यांना डाळीचे प्रकार, हिरव्या भाज्या, फळे, दूध, सुकामेवा आणि अंडी सारख्या प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करावा. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी, पुरेसे पाणी प्यावे आणि फायबरयुक्त पदार्थ खावेत. त्याचबरोबर जास्त तळलेले, मसालेदार पदार्थ, बाहेरचे फास्टफुड, कॅफिन आणि गॅस निर्माण करणारे पदार्थ जसे की चणे, राजमा इत्यादी खाणे टाळावेत.

अशा प्रकारे घ्या तुमच्या आरोग्याची काळजी

यासोबतच डिलिव्हरीनंतर महिलेने अधिक विश्रांती घ्यावी, मात्र शरीरातील रक्ताभिसरण योग्य राहावे आणि लवकर बरे होण्यास मदत व्हावी म्हणून हळूहळू चालणे देखील महत्त्वाचे आहे. यासोबतच टाक्यांची स्वच्छता आणि योग्य काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची वेदना, सूज किंवा संसर्ग जाणवत असेल तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. स्तनपानामुळे आई आणि बाळ दोघांनाही फायदा होतो, म्हणून शक्य असल्यास, नक्कीच स्तनपान करा.

सिझेरियन डिलिव्हरीनंतर महिलेचे शारीरिक विश्रांतीसोबतच मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे देखील खूप महत्वाचे आहे, म्हणूनच कुटुंब आणि पतीचा पाठिंबा आणि मानसिक आधार देखील आईच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो. लक्षात ठेवा की सी-सेक्शन ही कमकुवतपणा नाही, ती एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी केली जाते. यासोबतच, शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यावर लक्ष केंद्रित करा आणि मुलासह स्वतःची काळजी घ्या.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)