आजच्या घडीला प्रत्येक व्यक्ती हा निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, आहारात भरपूर प्रमाणात भाज्या आणि फळे समाविष्ट करत आहे, कारण प्रत्येक भाज्या आणि फळाची स्वतःची खासियत असते आणि त्यामुळे ते अनेक आरोग्य फायदे प्रदान करतात. निरोगी राहण्यासाठी पोषण आवश्यक आहे. भाज्या आणि फळे हे खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचे उत्कृष्ट स्रोत आहेत. म्हणून, आहारात हिरव्या तसेच रंगीबेरंगी हंगामी भाज्या आणि वेगवेगळ्या फळांचा समावेश करणे उचित असते. अशातच तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्त भाज्या आणि फळे खाणे खूप फायदेशीर आहे, पण तुम्हाला माहिती आहे का कोणत्या रंगाची भाजी किंवा फळे खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
बहुतेक लोक त्यांच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करण्याचा आग्रह धरतात, कारण तंदुरुस्तीच्या बाबतीतही तुम्ही या भाज्या मनोसोक्त खाऊ शकता. याशिवाय आपण आहारात ज्या भाज्यांचे सेवन करत असतो त्या प्रत्येक रंगाच्या भाज्या आणि फळांचे पौष्टिक मूल्य वेगवेगळे असते. आज आपण लाल, हिरव्या, नारंगी आणि जांभळ्या रंगाच्या भाज्या आणि फळे खाल्ल्याने काय होते ते जाणून घेऊयात…
लाल रंगाची फळे आणि भाज्या
तुम्ही जर तुमच्या आहारात टोमॅटो, डाळिंब, बीट, स्ट्रॉबेरी, टरबूज, सफरचंद, लाल शिमला मिरची, चेरी यासारख्या गोष्टींचा समावेश केला तर ते तुमच्या त्वचेचे सूर्याच्या हानीकारक किरणांपासुन संरक्षण करते. याशिवाय हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात.
हिरव्या रंगााचे फळे आणि भाज्या खाण्याचे फायदे
आहारात तुम्ही जेव्हा हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करता तेव्हा या भाज्यांच्या सेवनाने तुम्हाला हृदयरोगाचा धोका कमी होतो. त्यामध्ये कर्करोगविरोधी संयुगे आढळतात. या पदार्थांचे दाहक-विरोधी गुणधर्म जळजळ इत्यादींना प्रतिबंधित करतात आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि तरुण बनवतात. हिरवे पदार्थ शरीराला नैसर्गिकरित्या विषमुक्त करण्यास मदत करतात.
नारंगी रंगाचे पदार्थ खाण्याचे फायदे
भोपळा, संत्री, पिकलेली पपई, रताळे तुमच्या आहारात समाविष्ट केल्याने प्रजनन रोग टाळण्यास मदत होते. या भाज्यांमध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर असते, त्यामुळे डोळ्यांसाठी ते फायदेशीर असते. याशिवाय, त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे कोलेजन वाढवण्यास मदत करतात.
जांभळ्या रंगाच्या पदार्थांचे काय फायदे आहेत?
जांभळ्या रंगाच्या पदार्थांमध्ये पॉलीफेनॉल असतात जे अनेक आरोग्याच्या समस्या टाळतात. यासोबतच, त्यात कर्करोगविरोधी संयुगे देखील आढळतात. हे पदार्थ तुमचे वय वाढत असताना तुम्हाला निरोगी ठेवतात, तुमची त्वचा तरुण ठेवतात, तुमचे हृदय निरोगी ठेवतात, खराब झालेल्या पेशी दुरुस्त करतात आणि तुमचे चयापचय वाढवतात. याशिवाय, वांगी, बेरी, द्राक्षे इत्यादी जांभळ्या रंगाचे पदार्थ खाल्ल्याने देखील एकरूप आरोग्य म्हणजेच विचार करण्याची, समजून घेण्याची आणि शिकण्याची क्षमता चांगली राहते.