स्वयंपाकघरात जेवण बनवताना वापरले जाणारे जिरे केवळ जेवणाची चव वाढवतेच असे नाही तर आरोग्यसाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. आपल्या आयुर्वेदात पचनसंस्था मजबूत करण्यासाठी, विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी, आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जिरे खूप महत्वाचे असल्याचे म्हंटले जाते. त्यामुळे हेच कारण आहे की बरेच लोकं जिरे वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या आहारात समाविष्ट करतात. तर काही लोकं जिरे भाजून त्याचे सेवन करतात, तर काहीजण जिऱ्याचे पाणी बनवून पितात.
पण लोकांच्या मनात हा प्रश्न अनेकदा उद्धभवतो की जिरे पाणी पिणे जास्त फायदेशीर आहे की चावून खाणे? तुम्हाला देखील हा संभ्रम दूर करायचे असेल तर आज आपण या लेखात या दोन्ही गोष्टीतून कोणते फायदेशीर आहे ते जाणून घेऊयात?
जिरे चावून खाणे कितपत फायदेशीर?
जिरे भाजून चावून त्याचे सेवन केल्याने तोंडात लाळ तयार होण्याची प्रक्रिया थेट वाढवते, ज्यामुळे पचनसंस्थेचे कार्य चांगले होण्यास मदत होते. लाळेमध्ये असलेले एंजाइम अन्नाचे योग्यरित्या पचन करण्यास मदत करते. ज्यामुळे गॅस, अपचन आणि पोटफुगीची समस्या कमी होते. म्हणजेच जिरे चावून खाल्याने तुमची पचनसंस्था मजबूत आणि अधिक सक्रिय राहते. तसेच जिरे चावून खाल्याने तुमचे तोंडाचे आरोग्य चांगले राहते. जिऱ्यामध्ये अँटिमायक्रोबियल गुणधर्म असतात जे तोंडातील बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. याशिवाय जिरे चावल्याने तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांच्या संसर्गापासून मुक्तता मिळते. तसेच हिरड्यांमध्ये रक्ताभिसरण देखील सुधारते जे एकूण तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे?
सकाळी रिकाम्या पोटी जिरे पाणी प्यायल्याने पोटात तयार होणाऱ्या आम्लाचे संतुलन राखले जाते, ज्यामुळे गॅस, आम्लता आणि अपचनाची समस्या कमी होते. हे पाचक एंजाइम्सचे स्राव वाढवते, जे आतडे निरोगी ठेवते. जिऱ्याचे पाणी पिल्याने शरीर हायड्रेट राहते, ज्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते, त्वचा स्वच्छ राहते आणि मूत्रपिंड व्यवस्थित काम करतात. पण जिऱ्याच्या पाण्याचे जास्त सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला कोणतेही शरिरीक आजार असल्यास जिऱ्याचे पाणी घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मी दोन्हीपैकी कोणती पद्धत अवलंबावी?
जर तुम्ही पचन आणि तोंडाच्या आरोग्याला प्राधान्य देत असाल तर तुम्ही जिरे चावून खावे. दुसरीकडे, जर तुम्हाला तुमचे शरीर डिटॉक्स करायचे असेल, ते हायड्रेटेड ठेवायचे असेल किंवा तुमचे चयापचय वाढवायचे असेल तर जिरे पाणी पिणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)