पर्यवेक्षिकांना प्रशिक्षण
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी पुणे जिल्ह्यात २१ ते ६५ वयातील महिलांकडून अर्ज भरून घेण्याचे काम सध्या सुरू आहे. सुरुवातीला ‘नारीशक्तीदूत’ अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज भरण्यात येत असून, त्यात काही अडचणी येत असल्याने आता ऑफलाइन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. योजनेची व्याप्ती वाढवताना त्याच्या अंमलबजावणीसाठी गाव पातळीवर; तसेच शहरात वॉर्डस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविका; तसेच पर्यवेक्षिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. गावपातळीवर या संदर्भात विशेष शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या आहेत.
बारामती, आंबेगावातून सर्वाधिक
‘लाडकी बहीण योजने’साठी पुणे जिल्ह्यातून आतापर्यंत एक लाख ३४ हजार ४९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक अर्ज ऑफलाइन पद्धतीने (८९ हजार ९७) आणि ऑनलाइन पद्धतीने ४५ हजार ४०१ अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक अर्ज बारामती, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतून प्राप्त झाले आहेत. भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यांतून सर्वांत कमी अर्ज प्राप्त झाले आहेत.
दर शनिवारी नावांचे वाचन
गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांचे ऑफलाइन पद्धतीचे अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात येत आहेत. या अर्जांची नोंद अंगणवाडी स्तरावर होत असून, नोंदवहीत त्याच्या नोंदी ठेवण्यात येत आहेत. ‘प्रत्येक शनिवारी सर्व नोंद झालेल्या लाभार्थ्यांच्या नावांचे चावडी वाचन करण्यात येणार आहे. पात्र, अपात्रतेबाबत आक्षेप असल्यास गाव पातळीवरच खातरजमा करावी. तालुकास्तरावर समितीने अंतिम मान्यता देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे,’ असेही सांगण्यात आले. गावांत भरलेले ऑफलाइन अर्ज ऑनलाइन स्वरूपात भरण्यात येणार आहेत.
तालुका एकूण अर्ज
बारामती १७,५०९
आंबेगाव १६,२७६
शिरूर १५,८४२
मावळ १३,१८३
जुन्नर १२,८४३
हवेली १०,६६५
इंदापूर १०,०८४
खेड १०,०३४
पुरंदर ९,७१८
दौंड ७,१०८
मुळशी ५,४५६
भोर ४,३७६
वेल्हा १,४३४