Kunal Kamra : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्यानंतर वादात सापडलेल्या कॉमेडियन कुणाल कामरा याला मद्रास हायकोर्टाने दिलासा दिला आहे. कुणाल कामरा याच्या अटकेला आता १७ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता १७ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी ७ एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा अंतरिम जामिनाची मुदत १७ एप्रिलपर्यंत वाढविली आहे. कुणाल कामरा याच्या विरोधात मुंबईतील खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कुणाल कामरा याने “नया भारत” नावाने अलिकडेच कॉमेडी शो दरम्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत सादर केले होते. त्यानंतर शिवसैनिकांनी कुणाल कामरा याचा स्टुडिओची तोंडफोड केली होती. खार पोलिस ठाण्यात कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मद्रास हायकोर्टाने ७ एप्रिल २०२५ रोजी कुणाल कामरा याच्या अटकेवर घातलेली बंदीची मुदत आता १७ एप्रिलपर्यंत वाढवत तोपर्यंत त्याला संरक्षण दिले आहे.
कुणालच्या वकिलांचा युक्तीवाद
सोमवारी या प्रकरणाची मद्रास हायकोर्टात सुनावणी. त्यावेळी याचिकाकर्त्याचे वकील व्ही. सुरेश म्हणाले की, आपल्या अशिलाविरुद्ध महाराष्ट्रात आणखी तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. २०२१ पासून तो तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात राहत आहे. मात्र त्याच्या वृद्ध आईवडिलांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन पोलिस त्यांना विनाकारण त्रास देत आहेत. तसेच कॉमेडी शोला गेलेल्या प्रेक्षकांना देखील मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, मुंबईतील खार पोलिसांनी आतापर्यंत कुणाल कामरा याला तीन वेळा समन्स दिले असून त्याला चौकशी साठी बोलावले आहे.