महाराष्ट्रातील मडुरे ते गोव्यातील पेडणे स्थानकादरम्यान असलेल्या पेरनेम (पेडणे) बोगद्यात अतिवृष्टीमुळे चिखल-पाणी रुळांवर आल्याने खोळंबलेली कोकण रेल्वे वाहतूक जवळपास ६ तासांनी रुळांवर आल्याचा दावा कोकण रेल्वेने केला आहे. रेल्वे वाहतूक सुरू झाल्यानंतर वेग मर्यादेसह रखडलेल्या मेल-एक्स्प्रेस रवाना करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र आणि गोवा हद्दीवर असलेल्या दोन स्थानकादरम्यान पेडणे हा बोगदा आहे. बोगद्यातील जडणघडण अत्यंत भुसभुशीत मातीची असल्याने बोगद्यातील रुळांवर अनेकदा चिखल येऊन रेल्वे वाहतूक ठप्प होते. सोमवारी दिवसभर महाराष्ट्र-गोवा हद्दीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पेडणे बोगड्यातील रुळांवर चिखल येऊन रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कोकण रेल्वेचे अभियंत्रे आणि दुरुस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी युद्धपातळीवर मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला. या पथकाला काही तासांनी मार्ग मोकळा करण्यात यश आले आणि रखडलेल्या रेल्वे सुरू झाल्या आणि प्रवाशांना दिलासा मिळाला.
तिरुवअनंतपुरम एक्स्प्रेस तब्बल नऊ तास त्याच ठिकाणी रखडली होती. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याची माहिती प्रवासी राजीव कदम यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ सोबत बोलताना दिली. चहा व बिस्किट पुड्यांची व्यवस्था आम्ही प्रवाशांनीच केली आहे प्रशासनाकडून प्रवाशांची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही, असे ही प्रवाशांनी सांगितले.
पेरनेम (पेडणे) बोगद्यात अतिवृष्टीमुळे चिखल-पाणी रुळांवर आले आहे. यामुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद आहे. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरू झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव वेगमर्यादेसह गाडया रवाना करण्यात येत आहे, अशी माहिती कोकण आणि मध्य रेल्वेने दिली आहे.
गाडी क्रमांक १२०५१ जनशताब्दी , २२११९ गोवा तेजस, १६३३४ वेरावल आणि २२६६० कोच्चूवेली एक्स्प्रेस आणि १०१०५ दिवा-सावंतवाडी या रेल्वेगाडया रखडल्या असून हळूहळू गंतव्य स्थानी रवाना करण्यात येत आहे, असे ही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.