कोकण रेल्वेच्या स्थापनेवेळी भविष्याचा विचार करून मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात आले होते. यामुळे दुहेरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता भासणार नाही. निश्चित केलेल्या टप्प्यांमध्ये काही भागात दुहेरीकरण झाले आहे. संपूर्ण दुहेरीकरणानंतर जादा मेल-एक्स्प्रेस चालवणे शक्य होणार आहे. सपाट जमिनीवर दुहेरीकरणासाठी प्रतिकिमी १५ ते २० कोटींचा खर्च येतो. डोंगर, दऱ्या-खोऱ्यात हाच खर्च प्रतिकिमी ८० ते १०० कोटींवर पोहोचतो. सध्या कोकण रेल्वेवर ५२ मेल-एक्स्प्रेस आणि १८ मालगाड्या धावत आहेत. दुहेरीकरणानंतर यात दुपटीने वाढ अपेक्षित आहे, असे झा यांनी सांगितले.
कोकण रेल्वेवर सरासरी ४ हजार मिमीहून अधिक पाऊस पडतो. यामुळे प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देऊन साधारण तीन महिन्यांआधी पावसाळीपूर्व कामांना सुरुवात होते. पावसाळापूर्व अत्यावश्यक कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ब्लॉक मंजूर घेण्यात आले होते. कोकण रेल्वेवरील बहुतांश जागेत एकच मार्गिका असल्याने त्यावरूनच मेल-एक्स्प्रेस आणि मालगाड्यांची वाहतूक होते. पावसाळापूर्व कामे करताना मेल-एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणात घसरण झाली होती. गेल्या पंधरवड्यात वक्तशीरपणाची सरासरी साधारण ५९ टक्के होती. आता ती ८७ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. प्रवाशांना स्थानकात ताटकळत राहू नये आणि त्यांचा प्रवास वेळेवर पूर्ण व्हावा, यासाठी रेल्वेगाड्यांचा वक्तशीरपणा ९५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे कोकण रेल्वेचे उद्दिष्ट आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यंदाही गणेशोत्सवात अधिक गाड्या
रस्ते प्रवासाच्या तुलनेत रेल्वे प्रवास परवडणारा आणि वेगवान आहे. यामुळे गणेशोत्सवात प्रवासी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. दर वर्षी जास्तीत जास्त गाड्या चालवण्याचे नियोजन कोकण रेल्वेचे असते. यंदाही शक्य तितक्या अधिक गाड्या चालवून प्रवाशांना सुरक्षितपणे इच्छितस्थळी पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, असे झा यांनी सांगितले.