राजेश लाटकर आणि राजेश क्षीरसागर
कोल्हापूर उत्तर मतदार संघातून महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा ३० हजार मतांनी विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचा पराभव केला आहे. या मतदार संघात अर्ज मागे घेण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना कॉंग्रेसच्या मधुरिमा राजे यांनी अर्ज मागे घेतल्याने कॉंग्रेसची अवस्था बिकट झाली होती. अखेर कॉंग्रेसने अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या राजेश लाटकर यांना पुरस्कृत करीत त्यांना आपला पाठींबा जाहीर केला होता. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी सतेज पाटील यांनी खांद्यावर घेतली होती. परंतू राजेश क्षीरसागर यांच्या समोर राजेश लाटकर यांचा निभाव लागला नाही.
काय घडला होता हाय व्होलटेज ड्रामा
कोल्हापूरातील उत्तर विधान सभेचा अर्ज मागे घेण्यासाठी अवघी काही मिनिटे शिल्लक कोल्हापूरात मोठा हायव्होल्टेज ड्रामा घडला होता. कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी अचानक माघार घेत अर्ज मागे घेतल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला होता. मधुरिमा राजे यांनी वैयक्तिक कारणांना माघार घेतल्याचे बोलले जात असले तरी यामुळे त्यांच्या विजयासाठी मेहनत घेणाऱ्या सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये एकनाथ शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर या मातब्बर उमेदवारासमोर अखरे कॉंग्रेसला उमेदवार राजेश लाटकर यांना पाठींबा द्यावा लागला होता.
मधुरिमा राजे यांची माघार जिव्हारी
राजघराण्यातील मधुरिमा राजे यांनी अचानक अशी माघार घेत अर्ज मागे घेतल्याने कोल्हापूर उत्तर येथील राजकारणाला निराळेच वळण लागले होते. मधुरिमा राजे यांची माघार सतेज पाटील यांना अधिकच जिव्हारी लागली होती. त्यामुळे सतेज पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अधिकच प्रतिष्ठेची बनली होती. या घडामो़डीमुळे कोल्हापूरात सतेज पाटील यांच्या बाजूने सहानुभूतीचे वातावरण तयार झाले होते. खरे तर सतेज पाटील यांच्या पसंतीचे उमेदवार राजेश लाटकर हेच होते.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारापुढे राजेश लाटकर यांचा निभाव लागण्यास अडचण येईल असे त्यांना वाटले होते. त्यामुळे अखेर राजेश लाटकर यांनी अपक्ष म्हणून उभे राहाण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीने राजेश लाटकर यांना पाठींबा दिल्याने त्यांना निवडून आणण्याची विडा सतेज पाटील यांना उचलावा लागला होता. महायुतीचे राजेश क्षीरसागर यांच्यात आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्यात आता दुरंगी लढत झाली. त्यामुळे ही लढत अटी तटीची बनली होती.