छातीत दगड, डोक्यात कोयता; मुलाने आईच्या बॉयफ्रेण्डला संपवलं, सांगली पोलिसांनी तासाभरात पकडलं

Sangli Man Killed Brutally: अनैतिक संबंधातून एका व्यक्तीचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे तीन अल्पवयीन मुलांनी या व्यक्तीचा खून केला आहे.

Lipi

सांगली: शहरालगत असणाऱ्या कदमवाडी रस्त्यावर भर दुपारी बाराच्या सुमारास सेंट्रींग कामगारावर कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. भर रस्त्यात झालेल्या घटनेने खळबळ उडाली. या हल्ल्यात दत्ता शरणाप्पा सुतार (वय ३०, शिवशंभो चौक, मूळ रा. इंदिरानगर) याचा मृत्यू झाला. दरम्यान, अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे तपासात समोर आले असून तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

घटनेनंतर एका तासात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. घटनास्थळी कोयता, चाकू जप्त करण्यात आला. कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी आजपासून सांगली दौऱ्यावर आहे. ते आज सकाळी उपाधीक्षक कार्यालयात गाठीभेटी घेत होते. त्याचवेळी ही घटना घडल्याने खळबळ उडाली. पोलिसांचा फौजफाटा तत्काळ रवाना झाला.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत दत्ता सुतार हा सेंट्रींग कामगार आहे. तो यापुर्वी इंदिरानगर परिसरात राहण्यास होता. गेल्या काही दिवसांपासून शिवशंभो चौकातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे सुतार हा त्या महिलेच्या घरीच राहण्यास होता. त्याच्यासोबत त्या महिलेचा अल्पवयीन मुलगाही रहात होता. आज सकाळी मृत दत्ता आणि त्याचा मित्र अतुल ठोंबरे हे कामासाठी घरातून बाहेर पडले. दुपारी बाराच्या सुमारास त्या महिलेच्या मुलाने मृत सुतार याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याला पैसे देण्यासाठी मृत सुतार व त्याचा मित्र ठोंबरे हे दोघे दुचाकी (एमएच ०९ बीक्यू ४९८५) वरून सांगलीवाडीतून कदमवाडी रस्त्यावर गेला. दरम्यान, त्याचवेळी संशयित मुलगा आणि त्याचे दोन साथीदार त्याठिकाणी होते.

अनैतिक संबंधाचा राग पुर्वीपासूनच त्या मुलाच्या मनात होता. त्याच रागातून त्याने काटा काढण्याचा कट रचला. दत्ता दुचाकीवरून त्याठिकाणी आल्यानंतर क्षणात संशयित मुलाने त्याच्या छातीवर दगड मारला. त्यामुळे दत्ता रस्त्यावर पडला. त्यानंतर या मुलाने हातातील कोयत्याने सपासप वार केले. वार इतके वर्मी होते की दत्ता रक्ताच्या थारोळ्यात पडला. या घटनेनंतर त्याचा मित्र ठोंबरे हा तेथून पळून गेला.

अतिरक्तस्त्राव झाल्याने दत्ताचा जागी मृत्यू झाला. पोलिस उपाधीक्षक विमला एम., शहरचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पथक घटनास्थळी होते. तासाच्या आत संशयितांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्यात उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार संदीप पाटील, गौतम कांबळे, संतोष गळवे यांचा समावेश होता. परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर तातडीने शहर पोलिसांनी ही माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दत्ता हा मृतावस्थेत दिसून आला. त्याच्या मृतदेहाजवळ एक कोयता आणि काही अंतरावर एक चाकू पडलेला दिसला. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णायात पाठवला. तोंडावर चार वर्मी वार झाल्याने दत्ताचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले. पण, घटनास्थळी मिळालेल्या हत्यारांनी त्याचा खून झाला नसून खुनात वापरलेला कोयतानंतर जप्त करण्यात आला.

आईला मारहाण केल्याचा उफाळलेला राग

दत्ता याचे संशयित मुलाच्या आईशी अनैतिक संबंध होते. गेल्या काही दिवसांपासून तो त्या महिलेच्याच घरात राहण्यास होता. त्या महिलेस किरकोळ कारणातून वाद घालत मारहाणही करत होता. हे संशयित मुलगा नेहमी पहायचा त्यातून त्याचा राग उफाळत गेला. यापुर्वी देखील भांडण झाले होते. दत्ताचा काटा काढण्याचा कट यापुर्वीही रचण्यात आला होता. परंतू संशयितांने आज त्याला निर्जनस्थळी गाठत खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडाआणखी वाचा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)