पश्चिम रेल्वेवर आज 4 तासांचा जम्बोब्लॉक, कुठे, कधी, वेळ तर जाणून घ्या

पश्चिम रेल्वेवर आज 4 तासांचा जम्बोब्लॉकImage Credit source: social media

मुंबईकरांची लाईफलाइन असलेली लोकल अविरत धावत असते. रोजच्या रोज लाखो प्रवाशांचा, चाकरमान्यांचा भार वाहणाऱ्या या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वेळोवेळी देखभालीच्या, दुरूस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येत असतो. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेच्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि माहिम स्थानकांदरम्यान आज रात्री 4 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे, मात्र पश्चिम रेल्वेवर उद्या अर्थात रविवार, 04 मे 2025 रोजी दिवसा कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही. आज कोणत्या मार्गावर, कधी, किती वेळ ब्लॉक असेल ते सविस्तर जाणून घेऊया.

पश्चिम रेल्वेवर 4 तासांचा जम्बो ब्लॉक

रेल्वेमार्ग, सिग्नल प्रणाली आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेद्वारे आज शनिवार आणि रविवार च्या मध्यरात्री 00.15 ते पहाटे 4.15 या वेळेत चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई सेंट्रल आणि माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन फास्ट लाईनवर चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी याची प्रसिद्धी पत्रकानुसार माहिती दिली आहे.

या ब्लॉकच्या कालावधीत सर्व फास्ट लोकल गाड्या सांताक्रूझ आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान स्लो लाईनवर वळवण्यात येणार आहेत. या संदर्भातील अधिक माहिती संबंधित स्थानकप्रमुखांकडे उपलब्ध आहे. मात्र हा ब्लॉक फक्त पहाटेपर्यंतच असेल. उद्या, रविवारी, 4 में रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी विभागात अथवा त्या मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल. त्यामुळे सुट्टीनिमित्त बाहेर जाणाऱ्या, फिरायला जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडू शकेल.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)