कडू-कडू कारलं, गोड-गोड मधुमेहाला पळवून लावतं का? हा प्रश्न जसा कडू-गोड आहे, तसंच कोणत्याही आजारावर नियंत्रण मिळवायचं असेल तर अधिक कष्ट आणि त्यानंतर मिळाणारं छोटं यश, असा काहीसा हा प्रवास असतो. आज आम्ही तुम्हाला मधुमेहावर एक कडू उपाय सांगणार आहोत. अर्थातच कारल्याचा, जाणून घेऊया.
रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करताना मधुमेहींनी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. अशावेळी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात मधुमेहस्नेही खाद्यपदार्थांनी करणं गरजेचं आहे. असे केल्याने साखर नियंत्रणात राहते. मात्र, आजकाल लोकांचे शेड्यूल खूप बिझी असते. यामुळे त्यांना आरोग्याची काळजी देखील घेता येत नाही. पण जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
दरम्यान, कारल्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते का, असा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येतो. खरं तर आजकाल इन्फ्यूज्ड आणि हर्बल ड्रिंक्स बाजारात लोकप्रिय होत आहेत. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण घरी काय करू शकतो हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
तुम्हीही मधुमेही असाल आणि जाणून घेऊ इच्छित असाल की, कारलं खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित होतो का? तर याचे उत्तर आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता तुम्हाला देणार आहेत.
तज्ज्ञांचे मत काय?
डॉ. किरण गुप्ता सांगतात की, मधुमेही लोकांमध्ये कारलं इन्सुलिनसारखे काम करते, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण एकीकडे गोड आणि खारट पदार्थांचे सेवन करत आहात आणि दुसऱ्या बाजूला कारलं घेत आहात. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर त्यासाठी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीचे योग्य प्रमाणात सेवन करत असाल तरच कारल्याचा तुम्हाला फायदा होईल. त्यांनी पुढे सांगितले की, तुम्ही ताज्या कारल्याचा रस घेऊ शकता. याशिवाय हरभरा डाळीसोबत तुम्ही कारल्याची भाजी खाऊ शकता.
डॉ. किरण गुप्ता सांगतात की, तुम्ही कारलं तळून खाऊ नये कारण ते तळल्याने कारल्याचे सर्व पोषक घटक दूर होतात. डॉ. गुप्ता पुढे म्हणाले की, कारलं मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते, परंतु त्यासोबत आपल्याला व्यायाम आणि चालणे आणि संतुलित आहार देखील घ्यावा लागतो.
ते पुढे म्हणाले की, आपल्याला सतत कारल्याचे सेवन करावे लागेल तरच त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. हिरव्या भाज्यांसोबत तुम्ही कारलं बनवू शकता. तसेच ज्वारी आणि बाजरीच्या पोळीसोबत याचे सेवन करू शकता.
कारल्याच्या सेवनाचे इतर फायदे कोणते?
कारल्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हे फायबर, व्हिटॅमिन ए आणि सी आणि इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. कारल्याला आपल्या आहाराचा भाग बनवल्यास वजन कमी होण्यास मदत होईलच शिवाय आपली त्वचा आणि केसांची वाढ देखील सुधारेल. तसेच कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. इतकंच नाही तर कारल्यामध्ये पॉलिफेनॉल असतात, जे जळजळ कमी करण्यास मदत करतात. मधुमेहाव्यतिरिक्त, कारले श्वसन आरोग्य आणि यकृत डिटॉक्सिफिकेशनमध्ये देखील मदत करू शकते. मात्र, कोणताही आजार बरा करण्यासाठी कारल्याचे सेवन करायचे असेल तर सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.