मारहाणीपासून ते तोंडावर थुंकण्यापर्यंतचे..; वैष्णवी हगवणे प्रकरणी किरण मानेंचा संताप

पिंपरी-चिंचवड इथल्या वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज (शुक्रवार) पहाटे अटक करण्यात आली. याप्रकरणी सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेते किरण माने यांनीसुद्धा फेसबुकवर पोस्ट लिहून तीव्र संताप व्यक्त केला आहे. गुन्हेगारांच्या राज्यात गुन्हेगाराला कधी शिक्षा होते का? असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचसोबत या पोस्टमध्ये त्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, अंबरनाथच्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणांचाही उल्लेख केला. या प्रकरणांप्रमाणेच वैष्णवीलाही न्याय मिळण्याची शक्यता शून्य असल्याचं त्यांनी म्हटलंय.

किरण मानेंची पोस्ट-

‘कोडगे झालेत हे. हा महाराष्ट्र इतिहासातल्या सगळ्यात नीच नराधम्यांच्या मगरमिठीत सापडला आहे. हे आता होत राहणार. गुन्हेगारांच्या राज्यात गुन्हेगाराला कधी शिक्षा होते का? संतोष देशमुख प्रकरणात राजीनामा दिलेल्या मंत्र्यांच्या पुनर्वसनाची निर्लज्ज बातमी आजच पाहिली. वाईट याचं वाटतं की, वैष्णवी नावाच्या एका भगिनीचा हुंड्यासाठी अतोनात छळ झालाय. मारहाणीपासून ते तोंडावर थुंकण्यापर्यंतचे प्रकार झालेत. बिचारीनं टोकाचं पाऊल उचललं. हे सगळं करणारा जरी सत्ताधारी पक्षातला पदाधिकारी असला, तरी त्याच्यावर यापूर्वी आधीच्या सुनेनं लैंगिक छळाचाही आरोप केलेला आहे. एक ‘महिला’ म्हणूनही याबद्दल संवेदना न वाटता, त्यांना स्वत:चा इगो महत्त्वाचा वाटला,’ असं त्यांनी लिहिलंय.

न्यायप्रक्रियेबाबत निराशा व्यक्त करत ते पुढे म्हणाले, “अंबरनाथची चिमुरडी, संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी यांच्याप्रमाणेच वैष्णवीलाही न्याय मिळण्याची शक्यता शून्य आहे. कारण सगळ्या प्रकरणांचे लागेबांधे सत्तेपर्यंत जातात. तात्पुरती गरमागरमी होणार, कारवाया होणार, खूपच गरज वाटली तर खोट्या एन्काऊंटरसारखी हवाबाजी होणार. नंतर खरे आरोपी खुलेआम फिरणार. इतिहासातल्या सगळ्यात किळसवाण्या नराधम्यांना महाराष्ट्राच्या छाताडावर नंगानाच करताना बघा… पर्याय नाही.”

दरम्यान वैष्णवीच्या सासऱ्यांना आणि दीराला अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी सहा पथकं तैनात करण्यात आली होती. अखेर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्या दोघांनी पोलिसांनी अटक केली. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांचा अटकेच्या आधीचा सीसीटीव्ही व्हिडीओसुद्धा समोर आला आहे. यामध्ये ते मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारताना दिसून आले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)