दावा किंगमेकरचा, पण विधानसभा निवडणुकीत भोपळाही नाही फोडता आला, महायुती का ठरली गेमचेंजर?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतपेटीने जो एकांगीपणा दाखवला. महायुतीने सर्वांनाच हाबाडा दिला. त्यातून अनेकजण अजूनही सावरलेले नाहीत. ही निवडणूक जणू वेगवेगळ्या ध्रुवावर सुरू होती असं काही पक्षांच्या एकंदरीत प्रचार तंत्रावरून दिसून आले. जनतेची नाडी ओळखण्यात काय चूक होत आहे आणि राजकारण कस नव्या दिशेला गेलं, याचं वारं त्यांना ओळखताच आलं नाही, असं निकालानंतर तरी म्हणावं लागेल. काही पक्ष त्याच त्याच मुद्यात अडकून गेले तर महायुतीने गेमचेंजर योजना आणि आश्वासनांचा पाऊस पाडला. त्यामुळे किंगमेकरचा दावा करणाऱ्या पक्षांना निवडणुकीत भोपळा सुद्धा फोडता आला नाही.

‘वंचित फॅक्टर’ ला सुद्धा धक्का

जरांगे फॅक्टर प्रमाणेच या विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर सुद्धा निष्प्रभ ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजपाच्या लाटेत अनेक छोटे-मोठ्या पक्षांचे अस्तित्वच आता पणाला लागले आहे. त्यांनी कामगिरी सुधारली नाही तर ते इतिहासजमा होण्याची भीती काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. वंचितने 2019 मधील लोकसभा निवडणुकीत दे धक्का दिला होता. वंचितने 13 जागांवर 1 लाखांहून अधिक मतं घेतली होती. निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा नाहीतर इतर छोट्या पक्षांना मोठा फटका बसला होता. 13 उमेदवार वंचितमुळे पडले होते.

या लोकसभेत वंचितला फारसे यश आले नाही. पण विधानसभेत वंचित मोठी खेळी करेल असे बोलले जात होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीने 200 उमेदवार रिंगणात उभे केले होते. निकालापूर्वीच प्रकाश आंबडेकर यांनी आपण सरकार स्थापन करणाऱ्यांसोबत असू असे स्पष्ट संकेत दिले होते. वंचितची गरज सत्ता स्थापनेत घ्यावीच लागेल हे त्यामागील गणित होते. पण विधानसभा निकालात वंचिताला एकही जागा मिळाली नाही.

एकहाती सत्ता नाहीच

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला जाहीर पाठिंबा दिला होता. तर या विधानसभा निवडणुकीत मनसे रिंगणात उतरली. मनसे या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का देईल अशी चर्चा होती. विशेषतः मुंबई, ठाणे पट्ट्यात मराठी भाषिक पट्ट्यात मनसे कार्ड धक्कादायक निकाल नोंदवेल असा दावा होता. पण या निवडणुकीत मनसेची एकही जागा आली नाही. 2019 मध्ये आलेल्या आमदाराला पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना सुद्धा यश मिळाले नाही.

निकालानंतर मनसेच्या पाठिंब्याने भाजपाचा मुख्यमंत्री होईल असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. तर 2029 मध्ये मनसेचा मुख्यमंत्री होईल अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली होती. राज ठाकरे यांच्या मनसेने या विधानसभा निवडणुकीत 128 जागा लढवल्या. पण त्यांना एका पण जागेवर यश मिळाले नाही.

बच्चू कडू यांना धक्का

प्रहार जनशक्ती संघटनेचे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाने राज्यात 38 जागांवर निवडणूक लढवली. तिसऱ्या आघाडीचा त्यांनी प्रयोग केला. राज्यात आता अपक्षांचे पीक येणार असं भाकीत त्यांनी केलं होतं. पण त्यांच्या पक्षाची एकही जागा निवडून आली नाही. तर बच्चू कडू यांना अचलपूर विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.

या छोट्या पक्षांना निवडणुकीत यश

समाजवादी पक्ष, जनसुराज्य पक्षाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. तर युवा स्वाभिमानी पक्ष, एमआयएम, शेतकरी आणि कामगार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, राजश्री शाहू विकास आघाडी यांना एकच जागा मिळवता आली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)