खडसे, महाजन वादात आता सदावर्तेंची उडी; एकनाथ खडसेंना दिला थेट इशारा

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप खडसे यांनी एका पत्रकाराच्या हवाल्यानं केला आहे. यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. खडसे यांनी केलेल्या आरोपांनंतर गिरीश महाजन देखील आक्रमक झाले आहेत.  खडसेंनी एकजरी पुरावा दिला तर मी राजकारण सोडेल असं महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच मी जर एकनाथ खडसे यांची एक गोष्ट बाहेर काढली, तर त्यांना घराच्या बाहेर पडता येणार नाही, लोक त्यांना जोड्यानं मारतील असं महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान खडसे आणि महाजन यांच्यामध्ये सुरू असलेल्या या वादात आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. सदावर्ते यांनी या प्रकरणात बोलताना एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. खडसे यांनी माफी मागावी अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. त्यांनी जर माफी नाही मागितली तर मी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? 

महिला अधिकारी या सावित्रीच्या लेकी, तुम्ही त्यांना बदनाम करू नका, गिरीश महाजन यांना बदनाम करू नका, खडसे तुम्ही माफी मागा, जर माफी मागितली नाही तर राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार, असा  इशारा यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, हे नीच वागणं झालं, सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली
त्यांची वैचारिक दिवाळखोरी झाली आहे, राज्यपालांकडे १०० कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी केस पेंडिग आहे. त्यांचा खोटा बुरखा फाडला जाईल, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा नाव न घेता मनसे प्रमुख राज ठाकरे यांना डिवचलं आहे.  त्यांच्या नामशेष राहिलेल्या पक्षाबद्दल आजच्या दिवशी काय बोलावं. काही पक्षांचं शिदोरीवर सगळं असतं. शिदोरी संपेपर्यंत आता काही विषय बाहेर येत नाही, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)