खडसे, भुजबळ, धनंजय मुंडे झाले, आता अंजली दमानियांच्या टार्गेटवर शिंदे गटाचा बडा नेता? थेट सभेतच सूचक इशारा!

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आतापर्यंत अनेक गौरप्रकारांना वाचा फोडली आहे. भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारताना त्यांनी राजकारणातील अनेक बड्या नेत्यांशी दोन हात केलेले आहेत. त्यांनी याआधी माजी मंत्री एकनाथ खडसे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर नुकतेच त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. असे असतानाच आता त्यांच्या टार्गेटवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा बडा नेता आला आहे. आता या नेत्याविरोधात लढा उभारण्याची वेळ आली आहे, असा सूचक इशार अंजली दमानिया यांनी दिला आहे.

अर्जुन खोतकर यांच्याकडे आपला मोर्चा वळवला

अंजली दमानिया यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणही लावून धरलेले आहे. याच काळात त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर स्वरुपाच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा आता माजी मंत्री तथा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. दमानिया यांनी एका सभेत बोलत असताना खोतकर यांचे नाव घेऊन त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. तसेच खोतकर यांच्याविरोधात आता लढा उभारण्याची वेळ आली आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?

अंजली दमानिया जालना येथे एका सभेत बोलत होत्या. यावेळी बोलताना “अर्जुन खोतकर यांनी जिथे-जिथे हात लावला तिथे-तिथे त्यांनी माती केली. जनता सहकारी साखर कारखाना असो, जालन्याची कृषी उत्पन्न बाजार समिती असो किंवा खरेदी-विक्री केंद्र असो या प्रत्येक ठिकाणी अर्जुन खोतकर यांनी माती केली आहे,” असा आरोप अंजली दमानिया यांनी केली. तसेच या घडीला मी ठरवलंय की अर्जुन खोतकर यांच्याविरुद्ध मोठा लढा उभा करण्याची वेळ आली आहे, असा सूचक विधानही दमानिया यांनी केलंय.

त्यामुळेच अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केल्यानंतर आता अंजली दमानिया नेमकं काय करणार? धनंजय मुंडे यांच्यावर ज्या पद्धतीने त्यांनी आरोप केले होते, त्याच पद्धतीने त्या अर्जुन खोतकर यांच्यावरही वेगवेगळे आरोप करणार का? असे विचारले जात आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)