अजित पवार म्हणाले, की सत्तेत सहभागी होण्यापूर्वी अमित शाह यांच्या भेटीसाठी ते दिल्लीला दहा वेळा वेश बदलून गेले होते, आज अजित पवारांनी असं केलं, उद्या एखादा दहशतवादी वेश आणि नाव बदलून येईल, याची जबाबदारी कोण घेणार? हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषय आहे. या प्रकरणात मुंबई आणि दिल्ली विमानतळाची चौकशी झाली पाहिजे, की अजित पवार वेश आणि नाव बदलून कसे गेले? एअरलाईनचीही चौकशी झाली पाहिजे, की नाव आणि चेहरा जुळत नसताना तुम्ही उड्डाण प्रवासाची परवानगी कशी दिलीत? एअरलाईन सातत्याने आमचं आधार कार्ड मागत असते, आम्ही दाखवलं की आमचं चेकिंग होतं, तेव्हा आम्ही विमानात बसतो, तुम्हाला नाही का विचारलं? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला.
नागरी उड्डाण मंत्रालयाने उत्तर दिलं पाहिजे, की सुरक्षेत एवढी हलगर्जी झाली कशी? आज अजित पवार अमित शाह यांना भेटायला येत होते, उद्या एखादा दहशतवादी येईल, सगळ्यांची कुटुंबं विमानाने फिरत असतात, कोणी जबाबदारी घेणारे की नाही? मुळात, माझा एक प्रश्न आहे, की अजित पवार चोरुन का भेटायला येत होते? असं काय शिजत होतं? दोन जुलैला अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होत शपथ घेतली. त्याच्या पाच दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर एका बँकेत भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. म्हणजे एकीकडे पाच दिवस आधी आरोप सुरु होते आणि दुसरीकडे दहा वेळा अजित पवार अमित शाहांना भेटत होते, नेगोशिएट करत होते. मग ना खाऊंगा ना खाने दुंगा कुठे गेलं? हे वॉशिंग मशीन नाही का? सगळे म्हणतात भाजप म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी झालेय. आता देवेंद्र फडणवीस आणि मोदीच याचं उत्तर देतील, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवारांना या प्रकरणाची कल्पना होती, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जर शरद पवारांना माहिती असतं, तर चोरुन जायची काही गरजच नव्हती. अजित पवार ताठ मानेने ऑफिशिअल बुकींग करुन विमानाने गेले असते. कोणी विचारलं, कशाला दिल्लीला चाललात… सहा जनपथ आहे… त्यांच्या काकांचं तर घर आहे, चोरी कसली. हे आपले संस्कार आहेत का? पुढची पिढी काय म्हणेल? त्यावेळी जे विरोधीपक्ष नेते होते, जे आज उपमुख्यमंत्री आहेत, ते नाव बदलून जातात, हे या महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण आहे का? जिथे देशाचे गृहमंत्री नियम कायदे बनवतात, त्यांना भेटायलाच चुकीचं नाव लावून जाता, संविधानाच्या चौकटीत याला जागा नाही, असं सुळेंनी निक्षून सांगितलं.