कल्याण डोंबिवलीत एप्रिल फुलवरून राजकीय वाद पेटला, मनसेचे सत्ताधाऱ्यांना झोंबणारे बॅनर, शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना विरुद्ध भाजप, शिवसेना विरुद्ध मनसे असे शीतयुद्ध सुरुच असते. आता एप्रिल फुलवरुन शिवसेना आणि मनसे यांच्यात बॅनरबाजी रंगली आहे. मनसेने सत्ताधाऱ्यांना डिवचणारे बॅनर लावले होते. डोंबिवलीच्या पलावा पूल आणि एक एप्रिल यावरुन ही बॅनर बनवले होते. त्याला आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यामुळे एप्रिल फुलवरुन डोंबिवलीत मनसे अन् शिवसेनेत राजकीय वॉर सुरु रंगला आहे. एक एप्रिल रोजी एप्रिल फुल बनवत खिल्ली उडवली जाते. त्यामुळेच राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवणारे बॅनर लावले.

मनसे काय होते बॅनर

मनसे माजी आमदार राजू पाटील यांनी एक एप्रिलनिमित्त एप्रिल फुल करणारे बॅनर लावले. पुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी त्यांनी हे बॅनर लावले. त्या बॅनरला शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनी टीकात्मक उत्तरही दिले. आश्वासनांनी ‘फुल्ल’ ! कधी होणार दोन्ही पलावा पुल ?…की, बनत होता..बनत आहे.. बनतच राहील पलावा पूल ? उत्तर द्या ३१ एप्रिलला कुणाल कामरा याच्या हस्ते पलावा ब्रिजचे उदघाटन होणार अशी बॅनर बाजी करत पलावा पुलाच्या विलंबावर राजू पाटील यांनी हल्लाबोल केला. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या हस्ते पुलाचे उद्घाटन होणार असल्याचे लिहिल्यामुळे अधिक चर्चा होत आहे.

राजेश मोरे यांनी दिले उत्तर

राजू पाटील यांना राजेश मोरे यांनी उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, राजू पाटील यांची शॅडो कॅबिनेटने आमदार म्हणून निवड, “आजच शपथविधी होणार” आणि “जगभरातून राष्ट्राध्यक्ष कल्याणला येणार!” अशा मजकुरासह “एप्रिल फुल”

मनसे आणि शिवसेनेच्या या पोस्टरबाजीमुळे दोन्ही गट आमनेसामने आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही राजकीय चर्चेला उधाण आले आहे. परंतु नागरिकांसाठी डोंबिवलीतील कल्याण-शीळ रस्त्यावर पलावा पूल महत्वाचा आहे. या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पलावा पुलाचे काम अनेक वर्षांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)