कल्यामधील घटनेनंतर रहिवासी संतप्त
आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण मुंबईत येत असतात, विविध भाषा, जात, पंथाचे लोक इथे राहून पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करतात. पण महाराष्ट्रात, मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसासोबतच कधीकधी दुजाभाव केला जातो. इथे राहण त्यांच्यासाठीच दिवसंदिवस कठीण होत चाललंय. कल्याणमध्ये असाच एक संतापनजक प्रकार घडला. तेथील एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये शुल्लक कारणावरून एका मराठी कुटुंबावर अमराठी कुटुंबाने हल्ला केला, बाहेरून गुंड आणून त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आला. यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून प्रचंड खळबळ माजली आहे.
कल्याण पश्चिमेकडील अजमेरा हाईट्समध्ये राहणाऱ्या देशमुख कुटुंबावर शुक्ला नावाच्या इसमाने हल्ला केला. लोखंडी रॉड डोक्यात हाणल्याने एका व्यक्तीच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून संतापाचे वातावरण आहे. मात्र हा प्रकार समोर येऊनही या घटनेतील मुख्य आरोपी शुक्ला याला पोलिसांनी अजूनही अटक केलेली नाही. त्यामुळ देशमुख कुटुंबासह सोसायटीमधील नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. “आता आम्हालाच हा परिसर सोडावा लागेल का?” असा सवाल आता पीडित धीरज देशमुख यांनी विचारला आहे.
संतप्त रहिवाशांकडून बॅनरबाजी
आरोपीला लौकरात लौकर बेड्या ठोकून त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही पोलीस आरोपीला अटक करत नसल्याने संतप्त रहिवाशांकडून परिसरात बॅनरबाजी करण्यात आली असून काही नागरीक रस्त्यावरही उतरले आहेत. गुन्हेगाराला कोणतीही जात, धर्म, प्रांत नसतो गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
हा जो हल्ला झाला तो अतिशय भ्याड हल्ला होता, माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे, अशा लोकांना समाजात राहण्याचा बिलकूल हक्क नाही, अशी प्रतिक्रिया एका महिलेने दिली. सध्याचं हे वातावरण पाहून मराठी माणूस आपल्याच शहरात स्वत:ला एकदम असुरक्षित समजतोय. बाहेरच्या प्रांतातून अनेक लोक येतात, सगळेजण आत्तापर्यंत गुण्या-गोविंदाने रहात होते, पण या घटनेनंतर शुक्लासारख्या मोजक्या लोकांमुळे प्रांत किंवा जात बदनाम होत असते. त्या व्यक्तीची लोकांमध्ये प्रचंड दहशत आहे. आम्हीच हा परिसर आता सोडून जायचा का ? असा उद्विग्न सवाल इथले नागरिक विचारत असून आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी केली जात आहे.
नेमकं काय घडलं ?
कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल सोसायटीत दोन अमराठी कुटुंबियांमध्ये भांडण सुरु होतं. तो वाद मिटवण्यासाठी शेजारे राहणारे मराठी कुटुंबातील व्यक्ती धीरज देशमुख यांनी हस्तक्षेप केला. यावेळी धीरज देशमुख यांनी दोन्ही कुटुंबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी एका अमराठी महिलेने तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात. चिकन मटन खावून घाण करणारे आहात, अशी शेरेबाजी केल्याने हा वाद वेगळ्या मार्गाला लागला. यानंतर अमराठी कुटुंबाने बाहेरुन माणसं मागवून मराठी कुटुंबियांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी शुक्ला नावाच्या व्यक्तीने लोखंडी रॉडने डोक्यात केलेल्या हल्ल्यामुळे एका तरुणाच्या डोक्यात तब्बल 10 टाके पडले आहेत. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले असून संतापाचे वातावरण आहे.