दाम्पत्यांच्या वाहनाला धडक;                                                     वाटेतच काळाचा घाला,  महिलेचा मृत्यू
नंदुरबार : कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी गाव सोडून शहरात दाम्पत्य स्थायिक झाले. मिळेल ती मजुरी करून कुटुंबाचं पालन पोषण पती-पत्नी करू लागले. मात्र या मजुरीवर घर चालवणे कठीण होत होते. कधी कधी हाताला काम मिळत नव्हते. त्यामुळे एका शाळेत कामाच्या शोधासाठी जात होते. मात्र, अर्ध्या रस्त्यातच हिराबाई चुनीलाल सरोदे यांच्यावर काळाने झडप घातली अन् होत्याच नव्हतं झालं.नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव येथील चुनिलाल सरोदे आणि त्यांची पत्नी हिराबाई चुनिलाल सरादे (वय ४२) हे दाम्पत्य गाव सोडून शहरात रोजगारासाठी आले. काही दिवसातच त्यांना एका शाळेत तात्पुरत्या स्वरूपात काम मिळाले. थोड्या कालावधीनंतर वर्षभरापूर्वी त्यांचे हातातील काम सुटले. घरची परिस्थिती बिकट असल्याने मिळेल ते काम करून कुटुंबाचे पालन पोषण करत होते. पती पत्नी मजुरीचे काम करत होते. दरम्यान त्यांना माहिती मिळाली की शहराबाहेरील एका शाळेत जागा रिक्त आहे आणि त्यांना कामासाठी माणसांची गरज आहे. त्यामुळे २३ जुलै रोजी बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कामाच्या शोधासाठी त्यांच्या दुचाकीने निघाले. मात्र अर्ध्या रस्त्यातच हिराबाई चुनीलाल सरोदे यांच्यावर काळाने झडप घातली अन् होत्याच नव्हतं झालं.

धुळे-नंदुरबार रस्त्यावरील हॉटेल हिरा एक्झिटिव्हसमोरील भल्या मोठ्या स्पीडब्रेकरचा अंदाज चुनीलाल सरोदे यांना न आल्याने हिराबाई सरोदे यांचा दुचाकीवरून तोल गेल्याने त्या खाली कोळसल्या. त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू होता. हा अपघात सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडला. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी शहरातील काझी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांचा उचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

मोठ्या स्पीडब्रेकरमुळे अनेक अपघात

धुळे-नंदुरबार रस्त्यावरील हॉटेल हिरा एक्झिटिव्हसमोर भले मोठे गतिरोधक आहे. या ठिकाणी अनेकदा अपघात झाले. याबाबत नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले.त्यामुळेच एका कष्टाळू महिलेला आपला जीव गमवावा लागला.